धुळे: धुळे लोकसभेचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे हे फक्त मोदी लाटेमुळेच दोनदा निवडून आले आहेत. त्यांच्याबद्दल लोकांमध्ये अत्यंत नाराजी आहे. धुळे लोकसभेतील नागरिकांसाठी एक शोकांकिता आहे की असा निष्क्रिय खासदार पुन्हा भाजपाने लादण्याचा प्रयत्न केला आहे, अशी सणसणीत टीका धुळे शहर विधानसभेचे एमआयएम पक्षाचे आमदार डॉ. फारुख शहा यांनी खासदार सुभाष भामरे यांच्यावर केली आहे.धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे शहर आणि मालेगाव हे दोन्ही विधानसभा मतदारसंघात एम.आय.एम पक्षाचे आमदार असल्याकारणाने पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांनी धुळे लोकसभेसाठी उमेदवार देण्याकरिता तयारी सुरू केली आहे. या लोकसभेच्या निवडणुकीतही कोणाचे उमेदवार पाडण्यासाठी नाही तर स्वतः विजयी होण्यासाठी मैदानात उतरणार आहोत, अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांसमोर आमदार फारुख शाह यांनी दिली.