• Thu. Nov 28th, 2024
    गरीबाची क्रूर थट्टा; रेशनकार्डवर मिळालेल्या साड्या निघाल्या फाटक्या; यवतमाळ जिल्ह्यातील प्रकार

    म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : राज्यातील अंत्योदय रेशनकार्डवर वर्षातून एक साडी मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने यावर्षी घेतला आहे. मार्च महिन्यापासून या साड्यांचे वाटप स्वस्त धान्य दुकानातून होत आहे. मात्र वाटप केलेल्या साड्या फाटक्या व कुचक्या निघाल्याने महिलांचा हिरमोड झाला आहे. जिल्ह्यातील झरी, कळंब व मारेगाव या तालुक्यांत हा प्रकार घडला आहे.

    राज्य यंत्रमाग महामंडळाच्यामार्फत ही योजना राज्यात राबविल्या जात आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, जाहिरात, वाहतूक खर्च, गोदामात साठवणूक, हमाली हा सर्व खर्च राज्य सरकार महामंडळाला देणार आहे. २०२३-२०२४या वर्षासाठी राज्य सरकारने महामंडळास प्रत्येकी साडी ३५५रुपये दिले आहे. स्थानिक स्तरावर पुरवठा विभागाच्यामार्फत स्वस्त धान्य दुकानातून साड्यांचे वाटप होत आहे.

    साड्याबाबत महिलांमध्ये उत्सुकता होती. साड्यांचे वाटप सुरू झाल्याचे कळताच त्यांनी आनंदाने स्वस्त धान्य दुकानासमोर रांगा लावून साड्या घेतल्या. पण मिळालेल्या साड्या फाटक्या व कुचक्या निघाल्याचे पाहून महिलांचा हिरमोड झाला आहे. हा प्रकार एकाच गावात घडला नाही तर झरी, कळंब, मारेगावसह इतर काही तालुक्यांत घडत असल्याचे दिसत आहे. गेल्या महिन्यात स्वस्त धान्य दुकानातून ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्यात आला. या महिन्यात प्रत्येक कुटुंबाला एक साडी मोफत वाटण्यात येत आहे. जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार १२८ अंत्योदय कार्डधारकांना प्रत्येकी एक साडी मोफत दिली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात ९१ हजार साड्या आल्या असून प्रत्येक तालुक्यातील गोदामात साड्या पोहचल्या आहे. ४२ हजार साड्या लवकरच येणार आहे. सहा रंगाच्या या साड्या आहे. साडी वाटप योजनेचे हे पहिलेच वर्ष आहे. पण पहिल्याच वर्षी फाटक्या व कुचक्या साड्या मिळाल्याने महिलांमध्ये नाराजी आहे.
    धक्कादायक! अंगणवाडीतील पोषण आहारात कीडयुक्त धान्य, कुठं होतोय चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ?
    महिला-दुकानदारांमध्ये वाद

    काही ठिकाणी महिलांनी नेलेल्या साड्या फाटक्या निघाल्याने त्यांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन साड्या परत करण्याचा प्रयत्न केला. पण फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसल्याचे सांगत दुकानदारांनी साड्या बदलून देण्यास नकार दिला. त्यामुळे अनेक ठिकाणी महिला व दुकानदार यांच्यात वाद होत असल्याचे दिसत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed