उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज्यातील गॅस टंचाईच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. तसेच त्यांनी धर्मांतर विरोधी कायद्याला आपला पाठिंबा असल्याचं नमूद केलं. पण याचबाबत विचारलेल्या प्रश्नावरुन त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला.
“घरगुती गॅस सिलेंडरची कुठेही टंचाई नाही, असं मुख्यमंत्री म्हणत आहेत तर मग रांगा का दिसत आहेत? मला तर आपल्याच माध्यमातून माहिती मिळाली की, मुंबईतील 30 ते 40 टक्के रेस्टॉरंट बंद झाली आहेत किंवा होत आहेत. या सगळ्या गोष्टीत सर्वसामान्य माणूस होरपळत असेल तर जनतेच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत नसेल तर त्यांच्या यंत्रणेत फार मोठा गलथानपणा किंवा ती यंत्रणा सदोष आहे. जो जनतेचं दु:ख किंवा जनतेच्या व्यथा जाणून घेत नाही किंवा जाणून सुद्धा त्या तशा नाहीच आहेत, असं माणणारे मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभले असतील तर राज्याचं कठीण आहे”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
‘जनतेने सरकारला जागा दाखवावी’
“सर्वपक्षीय बैठक ही बोलावण्यापेक्षा मला असं म्हणायचं आहे की, शेवटी टंचाई आणि महागाई याच्यात फरक आहे. टंचाई ही टंचाई असते. पण महागाई म्हणजे किंमत का वाढते? दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पंतप्रधानांनी जसा आपल्या गॅस निर्मितीचा प्रयोग सांगितला होता तोही प्रयत्न अनेकांनी करुन बघितला आहे. असं काही नाही की फक्त टीका करत आहेत. पंतप्रधान जे सांगत आहेत ते सुद्धा लोकांनी करुन पाहिलं आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच “जिथे निवडणुका राहिल्या आहेत तिथल्या जनतेने जागं होऊन सरकारला त्याची जागा दाखवली पाहिजे”, असं ठाकरे म्हणाले.
शिवसेना उबाठा आंदोलन करणार?
“गॅस टंचाईच्या विरोधात फक्त शिवसेनेने आंदोलनात उतरावं का? सगळ्यांनी उचरलं पाहिजे. शिवसेना ज्यांच्यासाठी उतरते त्या जनतेनेसुद्धा आमच्यासाठी उतरलं पाहिजे. शिवसेना तर सदैव लढणारी संघटना आहे. शिवसेना ही सदैव जनतेच्या हक्कांसाठी आणि ज्यांच्यामुळे व्यथा निर्माण होता त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी शिवसेना नेहमीच तत्पर आहेच. आम्ही आंदोलनही करु. मात्र ज्यांच्या हातात सरकार आहे ते सरकार याबद्दल काय करणार आहे? युद्धाच्या बाबतीत नेमकं काय परिणाम होतात? काय दुष्परिणाम होतात? हे पंतप्रधान कधीतरी आम्हाला सांगणार आहेत की नाही?”, असे अनेक प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.
धर्मांतर विरोधी कायद्यावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“धर्मांतराचे विधेयक आज विधानसभेत मांडलं गेलं. त्यानंतर ते उद्या विधान परिषदेत मांडलं गेलं. धर्म स्वातंत्र्य प्रत्येकाला असलंच पाहिजे. कुणीही कोणत्याही परिस्थितीत जोरजबरदस्तीने किंवा कुणाच्या असाहयतेचा फायदा घेऊन लबाडीने आमिष दाखवून धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहेत. म्हणून या धर्मांतर विरोधी किंवा धर्म स्वातंत्र्य म्हणून काय ते विधेयकाला नेमकं नाव द्या. त्या विधेयकाला आमचा पाठिंबा आहेच. पण धमक्या देणं, 50 खोके देतो सांगून धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहेच”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
“त्या विधेयकात म्हटलं आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये फसवून धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पण गेल्या काही वर्षांत भाजपप्रणित सरकार राज्यात आणि केंद्रात आहे. त्यामुळे हे भाजप सरकारचं अपयश आहे. तसेच नेमकं कोणत्या समाजात, कोणत्या विभागात अशा प्रकारचं धर्मांतर होत असेल त्याची माहिती दिली तरी आम्हाला सुद्धा सावध राहता येईल. आमचे सुद्धा कार्यकर्ते तिकडे तत्पर राहतील. कुणीही कुणावर जोरजबदरस्तीने धर्मांतर करत असतील तर त्याला आम्ही सुद्धा विरोध करु”, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.
