• Sat. Jun 6th, 2026
    Devendra Fadnavis : स्वेच्छेने धर्मांतर करायचं असेल तर काय करावं? देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सर्व स्टेप्स सांगितल्या

    Maharashtra Dharma Swatantrya Bill : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धर्मस्वातंत्र्य विधेयक आज सभागृहात मांडलं. यावेळी त्यांनी स्वेच्छेने किंवा कायदेशीर धर्मांतर करायची कुणाची इच्छा असेल तर काय करावं? याबाबत महत्त्वाची माहिती दिली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेच्या सभागृहात धर्मस्वातंत्र्य विधेयक सादर केले. बेकयादेशीरपणे होणाऱ्या धर्मांतराच्या विरोधात हा कायदा असणार आहे. पण स्वइच्छेने किंवा कायदेशीरपणे धर्मांतर करायचं असेल तर ते कसं करावं? याबाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सविस्तर माहिती दिली. “धर्मांतरण कुणाला करायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे त्याची तरतूद कायद्यात केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या न्याय निर्णयात सांगितलं आहे की, अशा प्रकारचा कुठलाही कायदा करत असताना एक व्हीप पद्धत धर्मांतरणाला घालून दिली पाहिजे. त्या संदर्भात धर्मांतराचा इरादा असलेल्या व्यक्तीने जशी लग्नाची नोटीस देतात तशी धर्मांतराची नोटीस द्यायची आहे. सक्षम प्राधिकरणाने ती खात्री करायची आहे की, हे स्वच्छेने धर्मांतर होत आहे. त्यानंतर त्या व्यक्तीला धर्मांतर करायचा अधिकार आहे. तो ते धर्मांतर करु शकेल. मात्र असं लक्षात आलं की, तरतुदींचं उल्लंघन करुन ते धर्मांतर करण्यात येत आहे. तर त्या संदर्भात सांगितल्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल. याबाबत कायद्यात विहीत पद्धत सांगण्यात आली आहे”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

    “समजा ती प्रक्रिया पूर्ण केली तर त्याची नोंद होईल. ती नोंद एकदा झाल्यानंतर ते कायदेशीर पद्धतीने आणि स्वेच्छेने केलेले धर्मांतर समजलं जाईल. त्याकरता कुठल्याही प्रकारची फौजदारी कारवाई किंवा तत्सम पद्धतीने काहीही आपल्याला करता येणार नाही. एखादा व्यक्तीने या संदर्भात कारवाई पूर्ण केली नाही. धर्मांतर केला आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नाही तर ते धर्मांतर मानलं जाणार नाही”, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

    धर्मांतराच्या विरोधात तक्रार कुणाला करता येईल?

    “एखाद्या व्यक्तीचे जबरदस्ती धर्मांतर केले आहे अशाप्रकारची तक्रार देण्याचे अधिकार व्यक्तीचे आई-वडील, भाऊ-बहीण, वैवाहिक, रक्ताचे किंवा दत्तक असे कुठलेही नाते असेल त्यांना ती तक्रार देता येईल. पण एखाद्या केसमध्ये पोलिसांना वाटलं की, या प्रकरणात तक्रारदार नाही पण गुन्हा तसा घडला आहे तर कायद्याने पोलिसांना सुमोटोचे अधिकार आहेत. पोलीस ते करु शकतील”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

    दोषी आढळल्यास शिक्षा काय होईल?

    “या कायद्यात अपराध घडला असेल तर त्याच्या शिक्षा दिलेल्या आहेत. त्यामध्ये सात वर्षे कारावास आणि एक लाख दंड आहे. अज्ञान, मनोविकल व्यक्ती असेल किंवा अनुसूचित जाती-अनुसूचित जमातीची व्यक्ती असेल तर त्या केसमध्ये सात वर्षे कारावस आणि 5 लाख दंड आकारले जाणार आहेत. सामूहिकपणे असं कार्य होत असेल तर सात वर्ष दंड आणि 5 लाख रुपयांचा दंड. तसेच दोषसिद्धी होईपर्यंत दुसरा गुन्हा असा केला तर 10 वर्षे करावास या कायद्याच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे. या कायद्याचं उल्लंघन करताना संस्था जबाबदार सापडली तर त्यावर कारवाई करण्याचे अधिकार शासनाला देण्यात आलेले आहेत”, अशी महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा