मुंबई महापालिकेच्या मैदानासाठीचा आठ हजार चौरस मीटरच्या राखीव भूखंडावर फसवणुकीने पंचतारांकित हॉटेल उभारणी आणि मनी लॉंडरिंगप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीच्या निशाण्यावर असलेले तरीही उद्धव ठाकरे यांना साथ देणारे आमदार वायकर यांच्या पक्षबदलाच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून सुरूवात झाली होती. ना जेलमध्ये जायचं ना शिंदे गटात, अशी वायकर यांची द्विधा मनस्थिती झालेली होती. तशा भावना त्यांनी काही पदाधिकाऱ्यांकडे व्यक्त केल्या होत्या. मात्र दरम्यानच्या काळात त्यांच्या मनाने शिवसेना शिंदे गटाच्या बाजूले कौल दिल्याने आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा निवासस्थानी त्यांचा अधिकृत प्रवेश पार पडेल, अशी माहिती आहे.
फसवणुकीने पंचतारांकित हॉटेल उभारणी प्रकरणात रवींद्र वायकर यांना अटकेची भीती होती. मी कोणताही गैरव्यवहार केला नाहीये परंतु तरीही राजकीय आकसापोटी माझ्या मागे चौकशीचं शुक्लकाष्ट लागलेले आहे, अशा भावना त्यांनी त्यांच्या निकटवर्तीयांकडे बोलून दाखवल्या होत्या. पण लोकसभेआधी हा पक्षप्रवेश होणे सत्ताधाऱ्यांसाठी महत्त्वाचे असल्याने अखेर आज सायंकाळी त्यांच्या शिवसेना शिंदे गटाच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरलेला आहे.
रवींद्र वायकर यांच्यावर दबाव असल्याचा राऊत यांचा दावा
‘शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ईडी वगैरे तपासयंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव आहे. येत्या काही दिवसांत शिवसेना सोडा. पक्षांतर करा. नाहीतर तुरुंगात जा असे त्यांना धमकावले जात आहे. हा दहशतवाद आहे. असे राजकारण याआधी कधीच घडले नव्हते’, असे एक्सवर पोस्ट करून खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते.