लातूरमधील औसा-तुळजापूर महामार्गावर बीएमडब्ल्यू कार आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू, २ जण गंभीर जखमी झाले आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बीएमडब्ल्यू कार (क्रमांक एम.एच. ०४ ई.जी. ७५००) शिवली येथून जेवण करून परतत होती. औसा शहराजवळील हॉटेल साईप्रसादसमोर लाकूड वाहतूक करणारा आयशर टेम्पो (क्रमांक एम.एच. २५ यू. ०५२२) रस्त्याच्या कडेला उभा होता. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट या टेम्पोला मागच्या बाजूने जाऊन धडकली.ही धडक इतकी भीषण होती की, आयशर टेम्पो पलटी झाला आणि बीएमडब्ल्यू कारचा छप्पर (टप) पूर्णपणे उडून गेला. या अपघातात कारमधील सहा प्रवाशांपैकी चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
Raigad Accident : नुकताच जुळ्या बाळांचा बाप झाला, स्टेटस ठेवलं, घरी जाऊन आनंद साजरा करण्याआधीच वनरक्षक पित्याचा दुर्दैवी अंत; रायगडमध्ये हळहळ
मृतांची ओळख
१. आबासाहेब आप्पासाहेब साळुंके (वय ३६), २. शुभम शेषराव पाटील (वय २६), ३. किसन रामलिंग साळुंखे (वय ४८, सर्व रा. बोरगाव (न.), ता. औसा), ४. धनराज काशिनाथ जाधव (वय ४६, रा. सांगली)
जखमींवर उपचार सुरू
या अपघातात जयहिंद विश्वास जाधव (रा. औसा) आणि विनायक श्रीकांत हलदर (रा. सांगली) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच औसा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने औसा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने जयहिंद जाधव यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले आहे.
Supriya Sule: अजितदादांचं स्वप्न, फडणवीसांची अर्थसंकल्पात घोषणा; पण निधी कुठे? नीरा-कऱ्हा प्रकल्पावर सुप्रिया सुळे यांचा सवाल
भरधाव वेगामुळे झालेल्या या अपघाताने संपूर्ण औसा परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आयशर टेम्पो आणि अपघातग्रस्त कार जप्त केली असून, पुढील तपास सुरू आहे. महामार्गावर असुरक्षितरीत्या थांबवलेली वाहने आणि बेशिस्त वेग, या दोन कारणांमुळे पुन्हा एकदा अपघातांचा प्रश्न गंभीर झाला आहे.
