कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावातील दहिसर मोरी या गावात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १४ कोटी रुपयांचा निधी सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या रस्त्याला मंजूर करण्यात आला आहे. या कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी पार पडला. या कामासाठी खासदार शिंदे आणि मनसे आमदार पाटील यांनी पाठपुरावा केला होता. कार्यक्रमादरम्यान तिन्ही नेत्यांचे ग्रामस्थांकडून, शिक्षकांकडून आणि आशा सेविकांकडून सत्कार करण्यात आला. या गावांमध्ये होत असलेली विकासकामे आणि या गावांचा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केल्याबद्दल खासदार श्रीकांत शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाषण करत असताना सांगितले की, महायुतीच्या माध्यमातून विकास कामे सुरू आहे. महायुतीमधील आमचे सहकारी राजू पाटील आमच्या सोबत आहेत. या सर्व विकासकामांसाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आभार मानले आहेत. लोकसभेपर्यंत ते १००% आमच्या सोबत राहणार आहेत. कारण की अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरासाठी त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी पंतप्रधानांचे आभार मानलेले आहेत. त्यांच्या पक्षाचा अजेंडा हिंदुत्वाचा आहे. विकासाचा अजेंडा आहे. हिंदुत्वाचा आणि विकासाचा अजेंडा या भागात होत असेल तर ते आमच्या सोबत राहणार यामध्ये शंका नाही. इतकेच बोलून रवींद्र चव्हाण थांबले नाहीत, तर आम्ही तिघे एकत्रच आहोत. कल्याण लोकसभेमधील असलेले सर्व लोकप्रतिनिधी एकत्रित आहोत. हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या अजेंड्यावर एकत्रित आहोत. हा मतदारसंघ उजव्या विचारसरणीचा आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा या मतदारसंघातून हॅट्रिक करून निवडून देणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मनसे आमदार राजू पाटील यांनी सुद्धा मंत्री चव्हाण यांची स्तुती करत सांगितले की, रवींद्र चव्हाण मंत्री झाले तेव्हा सर्वात जास्त आनंद मला झाला, कारण माझा हक्काचा माणूस मंत्री पदावर बसला आहे. त्यामुळे मनसे महायुतीत सामिल होणार का? अशी चर्चा आता रंगू लागली आहॆ.
दरम्यान मनसे महायुतीत सामिल होणार का? असा सवाल राजू पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, विकास कामे जेव्हा आम्ही करत असतो, तेव्हा मी नेहमीच एकत्र असतो. कारण शेवटी हे सरकार आहे, मी इथला स्थानिक लोकप्रतिनिधी आहे, मी केलेल्या विनंतीला किंवा मी केलेला मागणीला पाठपुरावा करून पाठपुराव्याला त्यांनी निधी दिल्यावर अर्थातच तेही लोक उपस्थित राहणार तिथे मीही असणार आहे. त्यामुळे त्यात वेगळ्या दृष्टीने बघण्याचा काही कारण नाही. राहिला विषय पक्षाचे हे जे काही धोरण आहे ते धोरण राज साहेब ठरवतात… ना ते रवींद्र चव्हाण ठरवतात…ना मी ठरवू शकत.. या गोष्टी वरिष्ठ पातळीवर चर्चेला जातात. मला वाटतं तेही त्याचा अर्थाने बोलले की काही गोष्टी आमच्या वरिष्ठ ठरवतील. परंतु इथे स्थानिक पातळीवर आम्ही नक्की एकमेकांसोबत असतो हे मान्य करायला काही हरकत नाही, असे आमदार पाटील यांनी सांगितले.