• Sat. Sep 21st, 2024
महाशिवरात्रीच्या फराळातून अनेकांना विषबाधा, ‘रेडी टू कूक’ पडलं महागात; काय घडलं?

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : महाशिवरात्रीच्या दिवशी फराळातून अनेकांना विषबाधा झाल्याची बाब पुढे आली आहे. त्रिमूर्तीनगरासह शहराच्या विविध भागांतील आणि कामठीतील रुग्णांना याचा त्रास जाणवल्याची तक्रार मनपाच्या आरोग्य विभागाकडे करण्यात आली. काहींना खासगी तर काहींना सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारानंतर आता त्यांनी प्रकृती चांगली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. याची गंभीर दखल घेत एफडीएच्या सात पथकांनी सोमलवाडा भागातील फराळी साहित्य जप्त केले.

-महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहीरवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (मेडिकल) तसेच मेयो येथे भेट देऊन रुग्णांची पाहणी केली.

-मेडिकलमध्ये चार रुग्णांना भरती करण्यात आले होते, उपचारानंतर आता त्यांची प्रकृती चांगली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाला याबाबतची माहिती देऊन पुढील तपास सुरू असल्याचे डॉ. बहीरवार यांनी सांगितले.

शिळे आणि भेसळीचे खाद्यपदार्थ ?

-कामठी तालुक्यातही फराळी खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने पन्नासावर नागरिकांना विषबाधा झाल्याची माहितीही पुढे आली. शिळे आणि भेसळीचे खाद्यपदार्थ असल्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. तपासानंतर सत्य परिस्थिती पुढे येईल, असे मनपाकडून सांगण्यात आले.

-‘महाशिवरात्रीनिमित्त बाजारात ‘रेडी टू कूक’ या नावाने मिळणारे पीठ आम्ही खरेदी करून थालीपीठ तयार केले. हा पदार्थ खाताच चक्कर येऊन उलट्या होऊ लागल्या. शंकरनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. माझ्यासह मुलगी आणि पत्नीलाही याचा त्रास झाला’, असे त्रिमूर्तीनगरातील जनार्दन नंदनवार यांनी सांगितले.

-त्रिमूर्तीनगरातच राहणारे लीलाधर बोरीकर आणि त्यांच्या पत्नीला हाच त्रास झाला. याच परिसरातील खासगी रुग्णालयात भरती केल्यानंतर डॉक्टरांनी अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगितले. आता प्रकृती चांगली आहे, असे बोरीकर यांनी सांगितले.
पुण्यात नोकरीचे आमिष दाखवून ४० तरुणांना गंडा, ‘कमांड’मधील सेवानिवृत्त क्लार्कला अटक
दुकानांमधून साठा मागविला परत

महापालिकेकडून तक्रार प्राप्त होताच अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) सात पथके तयार करून ती शहराच्या वेगवेगळ्या भागांत पाठविली. भाजणीचे पीठ आणि फराळी चिवड्याचे नमुने गोळा करण्यात आले. सोमलवाडा भागातून हे साहित्य वेगवेगळ्या भागांत वितरित झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक तिथे पोहोचले. तपासणीसाठी नमुने घेऊन साठा जप्त करण्यात आला आहे. वेगवेगळ्या भागांतील २० दुकानांमध्ये हा साठा वितरित झाला होता, त्यामुळे तो परत मागविण्यात आल्याचेही ‘एफडीएक’डून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed