• Thu. Sep 10th, 2026

भारत हा जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था – फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 7, 2026
भारत हा जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था – फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब – महासंवाद

मुंबई, दि. ७: भारत आणि फिनलंड यांच्यातील दीपक्षीय संबंध दृढ आहे. या दौऱ्यामुळे  हे संबंध अधिक दृढ होणार आहे. भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. फिनलंडला शाश्वत विकासासाठी भारताचे सहकार्य आवश्यक असल्याची बाब फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी अधोरेखित केली.

फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब भारताच्या दौऱ्यावर आहेत. हॉटेल ताज पॅलेस येथे भारत आणि फिनलंड येथील विविध कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत अध्यक्ष स्टब यांच्या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फिनलंडचे रोजगार मंत्री मॅटियास मार्टिनेन, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य गुंतवणूक अधिकारी डॉ. शंकर देशपांडे, फिनलंड परराष्ट्र मंत्रालयाचे राज्य सचिव जुका सोलोवारा, मुंबईतील फिनलंडचे कॉन्सिलेट जनरल एरिक अफ हॅलोस्ट्रॉम, सहाय्यक सजू नायर आदी उपस्थित होते.

राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब म्हणाले, नवी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा झाली. मागील काही वर्षांपासून भारतात मोठ्या प्रमाणावर विकासाचे वारे वाहत आहेत. प्रत्येक क्षेत्रात भारताने नेत्रदीपक प्रगती केली आहे. फिनलंड प्रत्येक क्षेत्रात भारतासोबत काम करण्यास तयार आहे. पायाभूत सुविधांमध्ये होत आलेल्या सुधारणा हे त्याचेच प्रतीक आहे. फिनलंडचा जीडीपी (ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन) हे आपल्या राज्याच्या बजेटपेक्षा कमी आहे. मात्र खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने ते वाढविण्याचा प्रयत्न आहे.

पर्यावरणाचे संवर्धन करीत शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी दोन्ही देशांनी सोबत काम करणे आवश्यक आहे. प्रगतीसाठी क्वांटम कम्प्युटिंग, सुपर कम्प्युटिंग, संशोधन, नावोन्मेष यांच्यासह नवीनीकरणीय ऊर्जा, हरित ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन झाले पाहिजे. युरोप भारतासोबत मुक्त व्यापार करीत आहे. यावरून भारताचे जागतिक पातळीवर असलेले महत्व विषद होते, असेही अध्यक्ष अलेक्झांडर स्टब म्हणाले. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय टी- ट्वेन्टी क्रिकेट जागतिक स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छाही दिल्या.

यावेळी मुंबईतील फिनलंडचे कॉन्सिलेट जनरल एरिक अफ हॅलोस्ट्रॉम यांनी सूत्र संचालन केले. तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य गुंतवणूक अधिकारी डॉ शंकर देशपांडे, तसेच फिनलंड येथील काही कंपन्यांचे प्रतिनिधींनी विचार व्यक्त केले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed