• Sat. Sep 21st, 2024

पाणीटंचाईच्या झळा तीव्र; देवळा तालुक्यात १५ गावे, २९ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

पाणीटंचाईच्या झळा तीव्र; देवळा तालुक्यात १५ गावे, २९ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

म. टा. वृत्तसेवा, देवळा : तालुक्यात यंदा सरासरीच्या तुलनेत ६८ टक्केच पाऊस झाला. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासूनच तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. परिणामी, दोन ते अडीच महिन्यांपासून तालुक्यातील १५ गावे, २९ वाड्यावस्तीवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. महिनाभरात विहिरींची भूजल पातळी तब्बल ३० फुटाने खालावून ७० फुटांपर्यंत गेल्याने आणखी पाच गावांच्या पाणीटंचाईत भर पडली आहे.

गतवर्षी जानेवारीत विहिरीची भूजल पातळी ३७ तर मे अखेर ४९ फुटापर्यंत असल्याने एकही टँकर सुरू नव्हता. यंदा मात्र जानेवारीत विहिरींची भूजल पातळी ७० फुटांखाली गेली आहे. देवळा तालुक्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने टंचाईच्या झळा वाढू लागल्या असूनही तालुक्यातील धरणाच्या पाणीसाठ्यातून उपसा थांबवण्यासाठी काटेकोर उपाययोजना केल्या जात नसल्याचे वास्तव आहे. तालुक्यातील किशोर सागर व गिरणा नदीकाठावरील विहिरीच्या साठ्यावर ४९ गावांच्या पाणीयोजना अवलंबून असल्याने अवैध पाणी उपसा थांबवावा लागणार आहे.

ही गावे अधिक तहानलेली

तालुक्यातील गिरणारे, कुंभार्डे, कापशी, भावडे, मेशी, चिंचवे, भिलवाड या वाड्यावस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. महिनाभरापासून मेशी, सांगवी, डोंगरगाव, वराळे, वाखारी, शेरी या सहा गावांसह वाड्यांची भर पडली आहे.

यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. पावसाने व उजव्या कालव्याच्या पूर पाण्याने किशोर सागर १०० टक्के भरले होते. सद्यस्थितीत किशोर सागरात २५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू असून, २० ते २५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

सद्यस्थितीत मागणीनुसार पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. पुढील काळात भासणाऱ्या पाणीटंचाई संदर्भात पाटबंधारे विभाग व स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन पुढील नियोजन करणार आहे.- बबन आहिरराव, प्रभारी तहसीलदार, देवळा
पाणीटंचाईच्या झळा, नाशिक जिल्ह्यातील साडेपाचशे वाड्या-वस्त्यांसाठी पावणेदोनशे टॅंकर
गतवर्षाची स्थिती

८०० मिमी पाऊस
०० टँकर
३७ फूट : विहिरीची भूजल पातळी (जानेवारी)

यंदाची स्थिती

३०५.० मिमी पाऊस
१५ टँकर
७० फूट : विहिरीची भूजल पातळी (जानेवारी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed