• Sat. Sep 21st, 2024

उद्घाटन, भूमिपूजनांचा धुराळा; देवेंद्र फडणवीस, अजित पवार आज दिवसभर पुण्यात तळ ठोकून

उद्घाटन, भूमिपूजनांचा धुराळा; देवेंद्र फडणवीस, अजित पवार आज दिवसभर पुण्यात तळ ठोकून

म. टा. प्रतिनिधी, पुणे : लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने आज, रविवारी पुण्यात विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनांचा धुरळा उडणार आहे. या उद्घाटन, भूमिपूजनांच्या कार्यक्रमांसाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री दिवसभर शहरात तळ ठोकून आहेत.

वारजे येथील प्रभाग क्र. ३०मध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते रविवारी सकाळी नऊ वाजता होईल. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आदींसह आमदार-खासदार उपस्थित राहतील.

याच कार्यक्रमात घोरपडी येथे पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण, घोरपडी येथील पुणे-मिरज रेल्वे मार्गावर नव्याने उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन, वारजे येथील समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण आणि वारजे येथील २४ मीटरच्या विकास आराखड्यातील (डीपी) रस्त्याचे भूमिपूजन ऑनलाइन पद्धतीने होईल. दुपारी अडीच वाजता विश्रांतवाडी येथील मुकुंदराज आंबेडकर चौकात प्रस्तावित उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरचे भूमिपूजन फडणवीस आणि पवार यांच्या हस्ते होईल.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन आणि प्रस्तावित कामांचे भूमिपूजन करण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची धडपड सुरू आहे. त्यामुळेच वारजे येथील हॉस्पिटलच्या भूमिपूजनासाठी पालिका प्रशासनालाही बरीच धावपळ करावी लागली. रविवारच्या या दोन्ही कार्यक्रमांतून शहरातील पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूंच्या मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जाईल.

असे उभारणार हॉस्पिटल

महापालिकेतर्फे वारजे येथे ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ या तत्वावर उभारण्यात येणाऱ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी ठेकेदार कंपनीकडून काढण्यात येणाऱ्या ३६० कोटी रुपयांच्या कर्जाला महापालिका जामीन राहणार आहे. या कर्जाचा विमाही काढला जाणार आहे. यामुळे या प्रस्तावाला विरोध होत आहे. यात पालिकेवर कोणतेही दायित्व नसल्याचा दावा पालिकेने केला आहे. या हॉस्पिटलमधील १० टक्के खाटा मोफत, सहा टक्के ‘सीजीएचएस’ दराने, तर ८४ टक्के खाटा व्यावसायिक दराने उपलब्ध राहतील. या जागेपोटी पालिकेला दर वर्षी ९० लाख रुपये भाडे मिळणार असून, ३० वर्षांसाठीच्या या करारानुसार दर वर्षी भाड्यात तीन टक्के वाढ होणार आहे.
केसाने गळा कापू नका…रामदास कदम यांच्या तोंडून शिंदेंची खदखद? विश्वासू नेत्याकरवी भावना वदवल्याची चर्चा
जामीन राहण्यास अनेकांचा विरोध

‘हॉस्पिटलसाठीच्या ठेकेदाराच्या कर्जाला जामीन राहण्याचा महापालिकेचा निर्णय आत्मघातकी आहे. याबाबत महापालिका आणि राज्य सरकारने अगोदर पुणेकरांसमोर जाहीर खुलास करावा; यानंतरच हॉस्पिटलच्या कामाचे भूमिपूजन करावे,’ अशी मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख संजय मोरे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी या हॉस्पिटलचे भूमिपूजन जरूर करावे, मात्र ठेकेदाराच्या कर्जास महापालिका जामीन राहिल्यास याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी दिला आहे. ‘जनतेसाठीच्या आरक्षित जागेवरच, परदेशी कर्ज मिळवून कंत्राटदारांसाठी हॉस्पिटल बांधण्याचे आगळेवेगळे धोरण राज्य सरकार राबवत आहे. या हॉस्पिटलचा पुणेकरांना काहीही उपयोग नाही,’ अशी टीका करून आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत यांनी या निर्णयाला विरोध केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed