• Sat. Mar 14th, 2026

    देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात सोलर समूहाचे मोलाचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 7, 2026
    देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्यात सोलर समूहाचे मोलाचे योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    नागपूर, दि. ७: जगातील संरक्षणाचे क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. व्यापाराचाही शस्त्र म्हणून वापर होत आहे. अशा काळात ज्या देशाजवळ सामरिक शक्ती आणि तंत्रज्ञान आहे, तोच देश भविष्यात आघाडीवर असेल. या दिशेने आपला देश झपाट्याने वाटचाल करत असताना देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्याचे कार्य सोलर समूह करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

    सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसच्या वतीने मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या रोबोटिक्स ॲण्ड युएव्ही फॅसिलिटी प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते.

    यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार चरणसिंग ठाकूर, सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल, व्यवस्थापकीय संचालक मनीष नुवाल, राघव नुवाल, हर्ष नुवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, एकेकाळी संरक्षण सामग्रीच्या उत्पादन क्षेत्रात कुठलीही स्पष्टता नसताना सोलर समूह या क्षेत्रात कार्य करीत राहिला. आज या समूहाने देशातील आघाडीच्या संरक्षण उत्पादन कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे. अत्याधुनिक ड्रोन असो की पिनाका रॉकेटसारखे तंत्रज्ञान असो, देशाच्या सामरिक शक्तीला नवी दिशा देण्याचे कार्य या समूहाने केले आहे. बदलत्या जगात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, सेमी कंडक्टर इकोसिस्टीम तसेच क्वांटम टेक्नॉलॉजी महत्त्वाची भूमिका बजावित आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संरक्षण तंत्रज्ञान, एरोस्पेस आणि डीपटेक क्षेत्रासाठी नवे धोरण तयार केले. सोलरच्या माध्यमातून या धोरणांतर्गत झालेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे, याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले.

    ‘राष्ट्रप्रथम’ या विचारातून सोलर इंडस्ट्रीजची वाटचाल सुरु असताना राज्य शासनाकडून त्यांना संपूर्ण सहकार्य मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

    सोलर इंडस्ट्रीचे योगदान अभिमानास्पद- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

    जागतिक स्तरावर संरक्षण सिद्धतेच्या क्षेत्रात होत असलेल्या परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही आमची संरक्षणसिद्धता वाढवित आहोत आणि विश्वशांतीसाठी ते अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केले.

    रोबोटीक इंजिन आणि ड्रोनच्या क्षेत्रात मोठी प्रगती होत असून सध्या जगभरात सुरु असलेल्या संघर्षातून त्याची झलकही बघायला मिळत आहे. सोलरचा हा प्रकल्प देखील भविष्यातील तंत्रज्ञानाशी जुळलेला आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खासगी क्षेत्राची क्षमता लक्षात घेता सरकार या क्षेत्राला प्रोत्साहन देत आहे, याकडे केंद्रीय मंत्री गडकरी लक्ष वेधले.

    या कार्यक्रमात रोबोटिक्स अँड युएव्ही फॅसिलिटी निर्मिती विषयीची माहिती देणारी ध्वनीचित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांनी यावेळी समूहाच्या आजवरच्या वाटचालीची तसेच भविष्यातील ध्येय, धोरणांविषयीची भूमिका मांडली. राघव नुवाल यांनी आभार मानले. या कार्यक्रमास संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    रोबोटिक्स अँड युएव्ही फॅसिलिटीविषयी…

    सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडकडून उभारल्या जाणाऱ्या या युनिटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित मध्यम उंचीवर आणि लांब पल्ल्याचे उड्डाण करणारे ड्रोन, रोबोट, युएव्ही आणि विविध संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह पूर्णपणे स्वदेशी उत्पादनावर भर देणार आहे, ज्यामुळे ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला बळकटी मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतील, असा अंदाज आहे. या प्रकल्पामुळे नागपूरची ‘डिफेन्स हब’ म्हणून ओळख आणखी घट्ट होणार आहे.

    ०००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed