मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची ‘एसआयटी’ चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. जरांगे यांच्यावर त्यांच्या कथित सहकाऱ्यांनी आरोपही केले. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलन संपुष्टात आल्याची चर्चा होती. पण, मनोज जरांगे यांनी मागील आठवड्यापासून गावोगावी संवाद दौरे सुरू केले आहेत. या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत असून मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळण्याची शक्यता आहे. ‘सगेसोगरे’ कायद्याची अंमलबजावणी करा आणि ‘ओबीसी’ प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत. मराठवाड्यात गावोगावी त्यांनी मूळ मागण्यांवर जागृती सुरू केली आहे. त्यामुळे संवाद बैठकांना गर्दी वाढली आहे, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. येत्या १४ मार्चपर्यंत बीड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यात त्यांचा नियोजित दौरा आहे. दहा मार्च रोजी गेवराई, तलवाडा
, माजलगाव, मानवत, पोखरणी येथे संवाद दौरा आहे. त्याचप्रमाणे ११ मार्च रोजी लिमला, परभणी, झिरो फाटा, औंढा नागनाथ, येळेगाव, वसमत येथे दौरा आहे. बारा मार्च रोजी शिंदगी, बाळापूर, कामटा फाटा, डोंगरकडा, अहमदपूर आणि माळेगाव येथे दौरा होईल. त्यानंतर १३ मार्च रोजी कासार शिरसी, निलंगा, लातूर शहर, जेवळी नागझरी, अंबाजोगाई आणि १४ मार्च रोजी आनंदगाव, केज, धारुर, वडवणी, तांदळवाडी घाट येथे ते संवाद साधणार आहेत.मनोज जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका सुरू केली आहे. एसआयटी चौकशीचे ग्रामीण भागात प्रतिकूल पडसाद उमटले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सरकारने घाईने १० टक्के आरक्षण दिल्याचे सार्वत्रिक मत आहे. जरांगे यांनी लोकांना मागण्यांवर ठाम राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे अनेक गावात राजकीय नेत्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. आष्टी येथे भाजपच्या कार्यक्रमात आंदोलकांनी बॅनर काढण्यास भाग पाडले. तर बुटेगाव (ता. बदनापूर) येथे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण कुचे यांना गावात प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे त्यांना परतावे लागले होते. पोलिसांनी काही गावातील गावबंदीचे फलक हटविले आहेत. त्यानंतर ग्रामस्थांनी लोखंडी पाट्या लावल्या आहेत. आता लोकसभा निवडणुकीच्या काळात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
‘तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार’
सध्या मनोज जरांगे यांनी मराठवाड्यात संवाद दौरा सुरू आहे. वालसा खालसा (ता. भोकरदन) येथील शुक्रवारी त्यांनी मराठा समाजबांधवांशी संवाद साधला. जरांगे पूर्वीपेक्षा आक्रमक शैलीत संवाद साधत आहेत. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. ‘समाजासाठी आंदोलन करणाऱ्या माझ्यावर एसआयटी चौकशी लावली. पण, माताभगिनींवर लाठीमार करणाऱ्यांची चौकशी का करीत नाही, असा सवाल करीत लोकसभा निवडणुकीत मराठा समाज तुमचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही, असे जरांगे म्हणाले.
नेत्यांची जाहीर कोंडी
दोन दिवसांपूर्वी भाजपचे आष्टीचे आमदार भीमराव धोंडे यांचा जाहीर कार्यक्रम बंद पाडण्यात आला. फसवे आरक्षण देता आणि जरांगे यांची एसआयटी चौकशी लावता का असा प्रश्न करीत तरुणांनी या कार्यक्रमाला विरोध केला. लहुगड नांद्रा (ता. फुलंब्री) येथे महाशिवरात्रीच्या कार्यक्रमात भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांना उपस्थितांनी विरोध केला. काही दिवसांपूर्वी मंठा तालुक्यातील पोखरी गावात आमदार बबनराव लोणीकर यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळे त्यांना परतावे लागले होते.