• Sat. Sep 21st, 2024
महायुतीतील जागावाटपाचा पेच कायम, दोन दिवसांनी दिल्लीत पुन्हा बैठक, फडणवीसांकडून मोठी अपडेट

मुंबई: महायुतीच्या गोटातून जागावाटपासंदर्भात एक महत्त्वाची बातमी येत आहे. लोकसभेच्या जागावाटपावरु महायुतीतील तिढा अद्यापही कायम आहे. त्याबाबत दिल्लीत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत जागावाटपावर कुठलाही तोडगा निघाला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पुन्हा दोन दिवसांनी महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे.

अमित शाहांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा महाराष्ट्रातील महायुतीतील जागावाटपावर चर्चा होणार आहे. येत्या ११ मार्चला दिल्लीत ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत जागावाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महायुतीच्या जागावाटपाचं अडलं कुठे?

महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला जास्तीत जास्त जागा मिळवायच्या आहेत. अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यापूर्वी एकनाथ शिंदे गटाने २२ तर अजित पवार गटाने १६ जागांची मागणी केली होती. तर अमित शाहांच्या मुंबई भेटीनंतर एकनाथ शिंदे ११ आणि अजित पवार ५ जागांवर तयार होतील अशी चर्चा होती.

भाजप दोन्ही गटांना एक अंकी जागा सोडण्याच्या विचारात आहे, अशी चर्चा रंगली आहे. या गोंधळामुळे तिन्ही पक्षाचं जागावाटपावर एकमत होत नाहीये आणि पेच वाढत चाललाय, असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही असं दिसून येतं.

दिल्लीतील चर्चा सकारात्मक – देवेंद्र फडणवीस

दिल्लीत झालेली चर्चा अत्यंत सकारात्मक आहे. एकाच बैठकीत सगळे निर्णय होतील असं शक्य नाही. पण, ८० टक्के काम हे कालच्या बैठकीत झालं आहे. २० टक्के जे विषय राहिले आहेत ते एकमेकांशी चर्चा करुन लवकरच पूर्ण करु शकतो असा मला विश्वास आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed