अनंतराव थोपटे हे भोर विधानसभेचे काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांचे वडील आहेत. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती.
थोपटे घराणं काँग्रेसशी एकनिष्ठ
थोपटे घराणं पहिल्यापासून काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर विधानसभेमध्ये येणाऱ्या भोर, वेल्हा, मुळशी या तीनही तालुक्यात थोपटे यांचं गेली तीन ते चार दशकं वर्चस्व राहिलं आहे. अनंतराव थोपटे हे ६ वेळा काँग्रेस पक्षाकडून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले आहेत. तर, त्यांचे पुत्र आणि भोर विधानसभा मतदारसंघांचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे हे सलग ३ वेळा काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आले आहेत.
अनंतराव थोपटे यांनी त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रासाठी मंत्रीपदही भूषवलं आहे, तर थोपटे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असताना पवार यांनी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार देऊन थोपटे यांना पाडलं होतं. तेव्हापासून ते एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. तेव्हापासून पवार आणि थोपटे यांचं कधीच पटले नव्हतं. तर २०१९ नंतर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्ष पदासाठी संग्राम थोपटे यांचं नाव चर्चेत असताना राष्ट्रवादीतूनच त्यांना अंतर्गत विरोध पहायला मिळाला होता.
मतांची गणितं जुळवण्यासाठी पवारांकडून थोपटेंची भेट
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवारांसाठी आगामी निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. बारामतीमधून पवार यांच्यासमोर अजित पवार यांच्या माध्यमातून तगडं आव्हान असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मतांचं गणित जुळवण्यासाठी पवार राजकीय कार्यकिर्दीमध्ये कधीही न पटलेल्या व्यक्तीची भेट घेत असल्याचं बोललं जातं आहे.