मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यात खासदार शिवसेनेचाच होणार, पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या या आग्रही भूमिकेला जिल्ह्यातील जनतेकडून वाढता पाठिंबा मिळत असल्याने जिल्हा शिवसेनेत प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
पुरुषोत्तम जाधव म्हणाले, २००९ ची लोकसभा निवडणूक मी शिवसेना -भाजप युतीचा उमेदवार म्हणून लढलो. त्यावेळी मला दोन लाख ३४ हजार ५६ मते पडली. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत शिवरायांचा गादीचा जिल्हा कोणतेही कारण नसताना मित्र पक्षाला सोडण्यात आला. त्यावेळी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी सातारा लोकसभा निवडणूक अपक्ष लढलो. त्यावेळी मला एक लाख ५६ हजार मते पडली. त्यावेळी देशात मोदी लाट होती. परंतु त्या लाटेमध्येही मला भारत देशातील अपक्ष उमेदवारांमध्ये क्रमांक दोनची मते पडली आहेत. २०१४ मध्येच शिवसेनेचा भगवा फडकला असता, परंतु उद्धव ठाकरे यांनी मी तयारी करूनही माझ्यावर अन्याय केला आहे. त्यानंतर २०१९च्या पंचवार्षिक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपामधून नरेंद्र पाटील शिवसेनेमध्ये येऊन धनुष्यबाण या चिन्हावर लढले होते. कारण हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे, म्हणून परंतु त्यावेळेच्या निवडणुका झाल्यानंतर खासदार उदयनराजे यांनी राजीनामा देऊन भाजपवासी झाले आणि पोटनिवडणुकीला त्यांना भाजपतर्फे लढले. त्यावेळी आम्ही सर्व शिवसैनिकांनी त्यांचे काम केले आहे. आता संपूर्ण सातारा जिल्ह्यात शिवदूत आणि बूथप्रमुखांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत.
सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही हजारो कोटी रुपये निधी दिला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील वातावरण शिवसेनेसाठी लाभदायक आहे. त्यात तुम्ही सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र आहात. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेच्यावतीने लढल्यास उद्याचा खासदार हा शिवसेनेचाच असेल. यामुळे भविष्यातील सर्वच निवडणुकांसाठी शिवसेनेला फायदा होणार हे स्पष्ट आहे. महायुतीमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्यावतीने लढवण्यात यावा याबाबत सर्वांनी आग्रही भूमिका मांडली. यावर मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी सकारात्मकता दर्शवली आहे.