• Mon. Nov 25th, 2024

    रुग्णालये बनली ‘आओ जाओ घर तुम्हारा’!, महापालिकेची ६२ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

    रुग्णालये बनली ‘आओ जाओ घर तुम्हारा’!, महापालिकेची ६२ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकारी, एएनएम, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन हे कार्यालयीन वेळेत येऊन काम करत नसल्याचा ठपका वैद्यकीय विभागाने ठेवला आहे. या कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाइन हजेरी असतानाही त्याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ६२ जणांना महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच यापुढे विनापरवानगी गैरहजर आढळल्यास थेट सेवा समाप्त करण्याचा इशाराच वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिला आहे.

    महापालिकेची पाच मोठी रुग्णालये असून, चार प्रसूतिगृहे आहेत. बिटको आणि डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात उपचारासाठी गोरगरिबांची मोठी गर्दी असते. त्यांच्या आरोग्यसेवेच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गत महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी, एएनएम, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन यांची भरती करण्यात आली आहे. या सर्वांचे वेतन केंद्र सरकारच्या निधीतून दिले जात असले तरी, त्यांचे नियंत्रण मात्र पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे असते. महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये जवळपास दोनशेपेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी या योजने अंतर्गत कार्यरत आहेत. परंतु, यातील अनेक वैद्यकीय कर्मचारी विनापरवानगी गैरहजर राहणे, कामावर वेळेवर न येणे, ऑनलाइन हजेरी भरत नसल्याचे पालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या तपासणीत समोर आले आहे.

    मुख्यमंत्रीही डुप्लिकेट आणा, शिंदेंच्या बनावट स्वाक्षरीवरुन वडेट्टीवार भडकले, अजितदादा म्हणतात…

    …तर सेवासमाप्तीची कारवाई

    राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असेलल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी नेमणूक केल्याच्या ठिकाणी बायोमेट्रिक अटेन्डन्स प्रणालीमध्ये लॉग इन आणि लॉग आऊट करण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कामकाजाच्या वेळेत आपल्या कामाच्या तासाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. परंतु, २१ जानेवारी ते २० फेब्रुवारीपर्यंतच्या हजेरी अहवालात ६२ जण त्याचे पालन करत नसल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून समज देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे वेतनकपात करण्यात आले असून, यापुढे विनापरवानगी गैरहजर आढळल्यास थेट सेवासमाप्तीची कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

    निधी मिळूनही पाणी नाही, संतप्त महिलांचा मोर्चा, सरपंचांसह सदस्यांना ग्रामपंचायतीतच कोंडलं

    मटा भूमिका

    सरकारी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेची रुग्णालये म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच झाली आहेत. सरकारी रुग्णालयांतील आरोग्य व्यवस्थेची पार दैना झाली असताना, आहेत ते कर्मचारीही कामात टंगळमंगळ करीत असतील तर गोरगरिबांच्या आरोग्याचे तीन तेराच वाजणार आहेत. आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा असे समजून समाजाचे आरोग्य सुदृढ ठेवण्याची जबाबदारी खरेतर या कर्मचाऱ्यांकडून आहे. सरकारी आरोग्य व्यवस्था मजबूत असेल तरच समाजाचे आरोग्य ठीक राहील, हे तरी भान बाळगणे अपेक्षित आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed