• Sat. Sep 21st, 2024
आमची २७ जागांवर ताकद, मनोज जरांगेंना जालन्यातून उमेदवारी द्या, वंचितच्या प्रस्तावात काय काय?

मुंबई : कोणत्याही पक्षासोबत आघाडी नसताना वंचित बहुजन आघाडीने पाच वर्षांपासून ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण ताकदीने तयारी केली होती तसेच ज्या जागा जिंकण्याची खात्री होती, त्या लोकसभा मतदारसंघांची यादी आज महाविकास आघाडीला सादर केलेली आहे. तसेच महाविकास आघाडीला वंचितने एक प्रस्ताव देखील सादर केला आहे. महाविकास आघाडीचे सामाईक उमेदवार म्हणून जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी द्यावी तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान १५ ओबीसी उमेदवार असावेत, अशी अट वंचितने मविआसमोर ठेवली आहे.

मविआला वंचितचा कोणता प्रस्ताव?

– महाविकास आघाडीचे सामाईक उमेदवार म्हणून जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभिजित वैद्य यांना पाठिंबा द्यावा.
– महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान १५ ओबीसी उमेदवार असावेत.
– मविआच्या प्रत्येक घटक पक्षाने लेखी वचन दिले पाहिजे की, पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर भाजपमध्ये सामील होणार नाही.
– महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान ३ अल्पसंख्याक उमेदवार असावेत.

सध्या ज्या पद्धतीने पक्षांतर केले जात आहे, त्या पार्श्वभूमीवर घटक पक्षातील प्रत्येक पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर भाजपमध्ये सामील होणार नाही, असे लेखी वचन द्यावे, असे त्यात म्हटले आहे.
अकोला, सोलापूरनंतर प्रकाश आंबेडकरांना नव्या मतदारसंघाचे वेध, सभास्थळी ‘भावी खासदार’ बॅनर लागले

वंचित बहुजन आघाडीबद्दल महाविकास आघाडीची लपवाछपवीची रणनीती आणि उदासीन वृत्ती लक्षात घेऊन याआधी वंचितने ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली होती. त्या लोकसभा मतदारसंघाची यादी वंचितने तयार केली होती. आता महाविकास आघाडीने वंचितसोबत चर्चा सुरु केली आहे. तरीही वंचितने पूर्ण तयारी केलेल्या त्या मतदारसंघांची यादी महाविकास आघाडीला दिली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरी गेली असती, तर या यादीतील मतदारसंघातील जागा लढविल्या असत्या. पण, आता वंचितला आशा आहे की, या मतदारसंघांवर तीन पक्षांसोबत फलदायी चर्चा आणि वाटाघाटी होतील. दरम्यान, वंचितच्या मागणीवर अंतर्गत चर्चा करून आणखी एक बैठक घेण्यास महाविकास आघाडीने सहमती दर्शवली आहे. संविधान वाचविणे आणि लोकशाहीचे रक्षण करणे तसेच विभाजनवादी भाजप-आरएसएसचा पराभव करणे, हाच वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा आहे. त्यामुळेच सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन भाजपच्या विरोधात एकजुटीने लढले पाहिजे, अशी भूमिका वंचितने मांडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed