नांदेडच्या महापालिकेत काँग्रेसचे एकूण ८१ पैकी ७४ हे काँग्रेसचे नगरसेवक आहेत. त्यापैकी २४ नगरसेवक हे मुस्लीम समाजाचे आहेत. आता त्यांचा कार्यकाळ संपला असून महापालिकेवर प्रशासकराज आहे. मागील दीड वर्षांपासून अशोक चव्हाण हे भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र, त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा फेटाळून लावल्या होता. अचानक काँग्रेस सोडण्याचा निर्णय चव्हाण यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयाचा काँग्रेस कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे.
सर्वाधिक धक्का मुस्लीम समाजातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना देखील बसला आहे. माजी नगरसेवक असो किंवा पदाधिकारी यांनी अशोक चव्हाण यांच्यासोबत पक्षाचे काम केले आहे. अशोक चव्हाण काँग्रेस पक्ष सोडणार याबाबत त्यांना ही कल्पना नव्हती. राजीनाम्याबाबत त्यांनी आमच्याशी चर्चा करायची होती असं मुस्लीम समाजातील माजी नगरसेवकांसह पदाधिकारी म्हणत आहेत. दरम्यान त्यांच्या या निर्णयाने मुस्लीम समाजामध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
आम्ही काँग्रेस सोबत राहणार
दरम्यान अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली असली तरी मुस्लीम समाजातील माजी नगरसेवकांनी आपण काँग्रेसमध्ये राहणार असल्याचा निर्धार केला आहे. या बाबत अब्दुल सत्तार, मसुद खान, शमीम अब्दुल्ला, शेरअली, मुंतिजीबोद्दीन यांच्या सह आठ ते दहा माजी नगरसेवकानी मुंबई गाठून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. २४ माजी नगरसेवक हे काँग्रेस पक्षांसोबत राहणार असून पक्षाचं काम करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली आहे. भाजप सोबत जाणार नसल्याचे देखील ते म्हणाले. दरम्यान काँग्रेसचे माजी नगरसेवक हे ऐनवेळी दुसऱ्या पक्षात जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.