आमीन आणि नरवणकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी कॅबिनेटमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार आणि आमदार पराग अळवणी आदी उपस्थित होते. सकाळपासून त्यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा सुरू होती.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीने पुन्हा डोके वर काढले आहे. याआधी अनेक नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला होता. त्यानंतर मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केले. आता आणखी दोन माजी नगरसेवक भाजपच्या गळाला लागल्याने मुंबई काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
माजी नगरसेवक अमीन यांनी आपल्या राजीनाम्यात मुंबई काँग्रेसमधील पक्षनेतृत्वाबाबत नाराजीचा सूर आळवला आहे. ‘पक्षात गुणवत्तेला स्थान देण्यात येत नाही. तसेच कोणताही कार्यक्रम किंवा बैठकांसाठी पदाधिकाऱ्यांकडून फोन केला जात नाही, तर कार्यालयातील शिपायांमार्फत निमंत्रित करण्यात येते’, असे आरोप त्यांनी या पत्रात केले आहेत. या सर्व प्रकाराला कंटाळूनच आपण राजीनामा देत असल्याचे स्पष्ट करणारे अमीन यांचे पत्र सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले.
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनीही यासंदर्भात पक्षनेतृत्वावर जोरदार टीका केली आहे. अशोक चव्हाण यांच्यासारखे मोठे नेते पक्ष का सोडून जात आहेत, याचा केंद्रीय नेत्यांनी यापूर्वीच गांभीर्याने विचार करायला पाहिजे होता. हे जे काही घडतेय ते पक्षासाठी चांगले नाही. यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. यातूनच मुंबईतील काँग्रेसच्या आठ ते नऊ नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता हा त्याचा विचार जपण्यासाठी पक्षासोबत असतो. तो स्वत:च्या खिशातील पैसे मोजून पक्षाचे काम करतो. त्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता म्हणजे कोणाचा नोकर नसतो. मुंबई काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये ही भावना तीव्र आहे. वर्षा गायकवाड आणि नाना पटोले यांच्याकडून कार्यकर्त्यांना योग्य वागणूक मिळत नाही. त्यांना तुच्छपणे वागवले जाते. फक्त जवळच्या लोकांचे म्हणणे ऐकले जाते. या सगळ्यामुळे मुंबई काँग्रेसचा माजी अध्यक्ष म्हणून मला पक्षाची प्रचंड चिंता वाटत असल्याची प्रतिक्रिया जगताप यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
अनेक पदाधिकारी नाराज
मुंबई काँग्रेसमधील नाराजी आता हळूहळू प्रकर्षाने समोर येऊ लागली आहे. माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी यासंदर्भात टीका केल्यानंतर पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली बाजू मांडली आहे. अनेक जुन्याजाणत्या पदाधिकाऱ्यांना डावलले जात असल्याचा आरोप अनेक पदाधिकाऱ्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना केला.
चर्चांमध्ये तथ्य नाही : वडेट्टीवार
चंद्रपूर : ‘अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक आहे. अचानक त्यांनी हा निर्णय का घेतला माहिती नाही. माझ्याशी या विषयावर चर्चा झाली नाही. त्यांच्यासोबत २००७पासून बरोबर काम केले. त्यांच्याशी सलोख्याचे संबंधही आहेत. त्यामुळे कदाचित वावड्या उठल्या की, मीदेखील त्यांच्यासोबत जाणार. यात कुठलेही तथ्य नाही. तूर्त मी मतदारसंघात फिरत आहे,’ असा खुलासा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी केला.