• Sat. Sep 21st, 2024

पुणेकरांसाठी मोठी बातमी! गणेश जयंतीमुळे आज शिवाजी रस्ता बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणेकरांसाठी मोठी बातमी! गणेश जयंतीमुळे आज शिवाजी रस्ता बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

म. टा. प्रतिनिधी, पुणे : गणेश जयंतीच्या निमित्ताने आज, मंगळवारी (१३ फेब्रुवारी) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे दर्शनाकरीता येणाऱ्या भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे वाहनचालकांनी ‘पुणे दर्शन’ करून फिरून जाण्याचा एकतर्फी निर्णय पुन्हा पुणे वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. त्याचा सर्वांत मोठा फटका सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या हजारो सर्वसामान्यांना बसणार असून, पोलिसांनी संकष्टी चतुर्थीप्रमाणे दर्शनाची रांग आणि वाहतूक दोन्ही सुरू ठेवली पाहिजे, असा आग्रह धरला जात आहे.

नवीन वर्षाच्या निमित्ताने गर्दी होणार, अंगारकी चतुर्थीला गर्दी होणार, गणेश जयंतीला गर्दी होणार, अशी एक ना अनेक कारणे देत वाहतूक पोलिस दरवेळी शिवाजीनगर आणि स्वारगेट हे दोन महत्त्वाचे भाग जोडणारा शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद करतात. त्याचा मोठा ताण संपूर्ण शहरातील इतर रस्त्यांवरील वाहतुकीला बसतो. आधीच शहरात ठिकठिकाणी मेट्रो, उड्डाणपूल आणि रस्त्यांची कामे सुरू असल्याने वाहतूक संथ झाली असताना, सर्वांत वाहता रस्ता पूर्ण बंद करून ही वाहतूक ठप्प करण्याचा हा प्रयोग वाहतूक पोलिस थांबविणार आहेत की नाही, असा संतप्त सवाल बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून विचारला जात आहे. लाल महाल किंवा शनिपार अशा ठिकाणी बसने जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना स. गो. बर्वे चौकापासून वाहतूक बंद केली जाणार असल्याने जवळचे ठिकाण म्हणून जंगली महाराज रस्ता अथवा टिळक रस्ता येथे उतरावे लागणार आहे. दर वेळी रस्ते बंद केले जात असल्याने हा त्रास कितीवेळा सहन करायचा, अशी विचारणा नियमित या रस्त्याने जाणारे प्रवासी करीत आहेत.

नियमन कधी करणार?

शहरात नव्या पोलिस आयुक्तांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे; तसेच वाहतूक उपायुक्त म्हणून नव्या अधिकाऱ्यांनी कामकाज सुरू केले आहे. वाहतूक सुधारणेला प्राधान्य राहील, असे या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले असताना, गेल्या वर्षीप्रमाणे रस्ते बंद करण्याचा ‘प्रयोग’ या वरिष्ठांच्या हाताखालचे अधिकारी कधी तरी थांबवणार आहेत का? दगडूशेठ हलवाई गणपतीला कायमच गर्दी होणार म्हणून रस्ते बंद करण्याऐवजी कधी तरी नियमन करून गर्दीचे नियंत्रण आणि वाहतूक सुरू राहील, असा सुवर्णमध्य काढण्याचा मार्ग पुणे पोलिस कधी तरी शोधतील का, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

ठाण्यात दृष्टीहिनांना रस्ता क्रॉस करणं होणार सोपं, काठी टेकवताच मिळणार ‘ग्रीन सिग्नल’, कशी असेल यंत्रणा?
असा असेल वाहतूक बदल…

– पुरम चौकातून बाजीराव रस्त्यावरून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पुरम चौकातून टिळक रस्त्याने टिळक चौक व पुढे गोपाळ कृष्ण गोखले रस्त्याने (फग्युर्सन रस्ता) जावे.

– शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटला जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे.

– स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे.

– अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बंद करून ती बाजीराव रस्त्याने सरळ सोडण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed