मुंबईच्या तापमानात घट, १४ फेब्रुवारीपर्यंत गुलाबी थंडी
गेल्या दोन दिवसांत मुंबईच्या तापमानात घट झाल्याचं दिसून आलं. हवामान विभागानुसार, रविवारी मुंबईचं किमान तापमान १६.७ डिग्री सेल्सियसपर्यंत घसरलं तर कमाल तापमान ३१.५ डिग्री सेल्सियस इतकं नोंदवण्यात आलं. उत्तरेकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्याने जोर धरला आहे, त्यामुळे तापमानात घट झाली आहे.
१४ फेब्रुवारीपर्यंत तापमानात गारवा असेल, अशी माहिती हवामान तज्त्ज्ञ ऋषिकेश आग्रे यांनी दिली. हवामान विभागानुसार १७ फेब्रुवारीपर्यंत मुंबईचं किमान तापमान हे १७ ते २० डिग्री सेल्सियस असेल. तर दिवसा ३० ते ३२ डिग्री सेल्सियस असेल.
ढगाळ वातावरणाची शक्यता
मुंबई महानगर परिसरात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानुसार, १२ फेब्रुवारीला मुंबईत ढगाळ वातावरण असेल. पण, मुंबईत पाऊस पडण्याची शक्यता मात्र फार कमी आहे. पण, महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.