• Mon. Nov 25th, 2024

    अटल सेतूवरून बस नको, एसटीची नकारघंटा कायम, वेळेची बचत होत असूनही निर्णयास टाळाटाळ

    अटल सेतूवरून बस नको, एसटीची नकारघंटा कायम, वेळेची बचत होत असूनही निर्णयास टाळाटाळ

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: केंद्र-राज्य सरकार सार्वजनिक परिवहन सेवेस बळ देण्यासाठी धोरणात्मक पावले टाकत असताना एसटी महामंडळाकडून धोरणांना छेद देण्याचा प्रकार सुरू आहे. देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू असणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी सागरी सेतूवरून ई-शिवनेरी चालवण्यास एसटीची नकारघंटा कायम आहे. विशेष म्हणजे, प्रवासी वेळेत एका तासाची बचत होत असल्याचा निष्कर्ष एसटी अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणाअंती समोर आला आहे.

    मुंबई-पुणेदरम्यानच्या प्रवासाचा कालावधी वाचवणाऱ्या अटल सेतूवरून स्वारगेट-मंत्रालय आणि पुणे-मंत्रालय शिवनेरी एसटी सुरू करावी अशी प्रवाशांची मागणी आहे. यानुसार महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी वाहतूक विभागाला सर्वेक्षण करण्याचे निर्देश देऊन तेथून दोन गाड्या सोडण्याच्या सूचना केल्या.

    अटल सेतू सर्वसामान्यांसाठी सुरू होताच महामंडळाने या मार्गाचे सर्वेक्षण केले. यात पुणे ते दादर हे अंतर वाशी, कळंबोली मार्गापेक्षा पाच किलोमीटरने कमी आणि गर्दीच्या वेळेस प्रवास वेळेत तब्बल एका तासाची बचत होत असल्याचे दिसून आले.

    ‘कमांडो’ रोखणार सायबर गुन्हे, मुंबई पोलिसांचा सायबर शिल्ड प्रकल्प काय आहे? जाणून घ्या

    सोमवार ते शुक्रवारदरम्यान स्वारगेट-मंत्रालय व पुणे रेल्वे स्थानक-मंत्रालय अशा दोन बसगाड्या या मार्गावरून सुरू कराव्यात, असे निर्देश उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालकांनी वाहतूक विभागाला दिले होते. परंतु वाहतूक विभागाने या निर्देशाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. दादर येथून शिवडी अटलसेतूमार्गे ई-शिवनेरी सुरू करताना एकाच स्थानकातून ४५ प्रवासी मिळणे गरजेचे आहे. असे झाले तरच एसटीसाठी अटल सेतू परवडणारा मार्ग ठरणार आहे. प्रवासी वाढवण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमाची गरज आहे. प्रवासी येतील की नाही या नंतरचा मुद्दा असून एक-दोन गाड्यांसह प्रायोगिक तत्त्वावर ई-शिवनेरी सुरू करणे गरजेचे आहे. मात्र महामंडळात धाडसी निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने केवळ ‘पाट्या टाकण्याचे’ काम सुरू आहे, अशी चर्चा एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे.

    निर्णय होणार मुख्यालयातून

    अटल सेतूवरून दोन ई-शिवनेरी सुरू करण्याबाबतचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. एसटी सुरू करण्याचा निर्णय एसटी मुख्यालयातून घेण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. अटल सेतूवरून ई-शिवनेरी बस चालवल्यास तिकीट दरात कोणताही फरक पडणार नाही. सेतूवर टोल द्यावा लागणार आहे. मात्र कमी होणारे अंतर आणि टळणारी वाहतूक कोंडी यामुळे इंधन खर्चात बचत होणार आहे. यामुळे टोलमुळे तिकीट दरात वाढ करण्याची ही गरज नसल्याचेही या सर्वेक्षणाअंती एसटी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

    भूमिपूजन आणि लोकार्पणही स्वतः मोदीच करणार, समुद्रातून प्रवासाचा थरार देणारा अटल सेतू पाच वर्षात तयार

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed