थायलंडमध्ये सहलीला गेलेल्या २६ वर्षीय पूजा मुळेचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. आठ दिवसांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर मृतदेह अखेर मायदेशी परतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजाची मैत्रीण दुचाकी चालवत होती आणि पूजा मागे बसली होती. रस्त्यावरून जात असताना अचानक चालकीचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि वाहन वेगाने रस्ता दुभाजकाला (डिव्हायडर) जाऊन धडकले. या भीषण अपघातात पूजाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर तिच्या मैत्रिणीचा हात फ्रॅक्चर झाला. पूजाला तातडीने स्थानिक कुसूमई रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मावळली.
प्रशासकीय पाठपुरावा आणि मृतदेह मायदेशी
परदेशात मृत्यू झाल्यामुळे मृतदेह भारतात आणण्यासाठी मोठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागली. पूजाचे वडील बीडमधील पूर्णवादी बँकेत अधिकारी आहेत. आपल्या मुलीचा मृतदेह परत मिळवण्यासाठी कुटुंबाने प्रशासनाकडे धाव घेतली होती. भारतीय दूतावास, बीड जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर आणि सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, आज गुरुवारी पूजाचा मृतदेह विमानाने मुंबईत आणण्यात आला. तिथून रुग्णवाहिकेने तो बीडकडे रवाना करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar News : माफीनाम्यानंतरही तणाव, कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकरांना जमावाकडून मारहाण
परिसरात शोककळा
पूजा ही अत्यंत हुशार आणि कर्तबगार तरुणी होती. ती पुण्यात स्थायिक होऊन स्वतःचे करिअर घडवत होती. तिचा भाऊ सध्या शिक्षण घेत असून, कुटुंबाच्या मोठ्या आशा तिच्यावर होत्या. या घटनेमुळे मुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका आनंदी सहलीचा असा करुण अंत झाल्यामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Ahilyanagar News : अभिषेक कळमकरला कोर्टाचा झटका; अत्याचार प्रकरणात अटकपूर्व जामीन फेटाळला
परदेशात गेल्यानंतर दुचाकी किंवा चारचाकी चालवताना तिथल्या वाहतुकीच्या नियमांची आणि रस्त्यांच्या रचनेची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. ही घटना पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत चटका लावून जाणारी आहे. बीड जिल्ह्यासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
