अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळाची पूर्वसूचना मिळत असताना तटरक्षक दलासह राज्य प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी तयारी केली जातेच. त्यावेळी नागरिकांना किनारपट्टीपासून दूर असलेल्या शाळा, मंगल कार्यालये आदी ठिकाणी हलविले जाते. परंतु अनेकदा ती सोय अपुरी पडते. तसेच त्या ठिकाणी अनेदा वादळग्रस्त नागरिकांची गैरसोय होते. हे टाळण्यासाठीच आता सर्व सोयींनी युक्त निवारेच किनारपट्टीवर उभे होणार आहेत.
एमएसआरडीसीने पालघर ते सिंधुदुर्ग यादरम्यान एकूण ८५ गावांत असे निवारे उभे करण्यासाठी निविदा काढली आहे. ‘बहुपयोगी चक्रीवादळ निवारे’, असे त्याचे आहे. हे निवारे चार मजली असतील. त्यामध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा असतील. महिला व पुरुषांच्या निवारा व निवासाची यात स्वतंत्र सुविधा असेल. तसेच भोजन तयार करण्याची सोयदेखील त्यात असेल. वेगवेगळ्या ठिकाणी १२ ते १५ महिन्यांत या निवाऱ्यांची उभारणी संबंधित कंत्राटदाराला करायची आहे.
अरबी समुद्रातील चक्रीवादळे
गेल्या वर्षी अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले विपर्जय हे पहिले चक्रीवादळ होते. हे चक्रीवादळ अत्यंत संथगतीने पुढे सरकले, मात्र त्याची तीव्रता अल्प कालावधीत वाढली. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर अधिक नुकसान झाले. त्याआधी २०२१ मध्ये तौक्ते चक्रीवादळ गुजरात किनाऱ्याला धडकले होते. या चक्रीवादळाने शंभरहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. तौक्तेचा फटका महाराष्ट्रालाही बसला होता. गुलाब या चक्रीवादळातून पुढे शाहीन चक्रीवादळ निर्माण झाले आणि या चक्रीवादळाचा फटकाही महाराष्ट्राला बसला होता. तसेच मान्सूनपूर्व कालावधीत निसर्ग या चक्रीवादळाचीही झळ कोकण किनारपट्टीला बसली होती. त्या आधी क्यार आणि महा या दोन चक्रावादळांमुळेही पश्चिम किनारपट्टीवर नुकसान झाले होते.
असे असतील निवारे
जिल्हा तालुका गावे
पालघर पालघर २
ठाणे मिरा-भाईंदर १
रायगड मुरुड, श्रीवर्धन, म्हसाळा, पोलादपूर, महाड ३४
रत्नागिरी खेड-राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर २१
सिंधुदुर्ग कुडाळ, दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, कणकवली, वैभववाडी २७