• Sun. Jun 14th, 2026

    Pune News : पुण्यात पोलिसांची धडक कारवाई, सराईत गुन्हेगार शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळ शस्त्रासह फिरत होता, रंगेहाथ पकडला

    Pune News : पुण्यात पोलिसांची धडक कारवाई, सराईत गुन्हेगार शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळ शस्त्रासह फिरत होता, रंगेहाथ पकडला

    पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका सराईत गुन्हेगार रेल्वे स्टेशनजवळ शस्त्रांसह फिरत होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचत या गुन्हेगाराला अटक केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत असतात. शहरात अनेकदा गँगवारच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे अनेकदा पुण्यातील गुन्हेगारीचं वास्तव समोर आलं आहे. अशा घटनांमुळे पुणे पोलिसांकडूनही गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. पोलिसांकडून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जातात. चुकीचं कृत्य करणाऱ्या किंवा दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांच्या पोलिसांनी वेळोवेळी नांग्या ठेचल्या आहेत. तसेच त्यांची धिंड देखील काढलेली बघायला मिळाली आहे. असं असलं तरी काही गुन्हेगार शांत राहताना दिसत नाही. ते सर्रासपणे शस्त्र बाळगतात. पण पोलीस अशा गुन्हेगारांविरोधात नेहमी कठोर कारवाई करतात. आतादेखील पोलिसांनी अशीच कारवाई केली आहे.

    शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत गावठी पिस्तुल बाळगून फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आली.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस हवालदार दीपक चव्हाण आणि सचिन जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एक सराईत गुन्हेगार शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात गावठी पिस्तुल घेऊन येणार आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने परिसरात सापळा रचला. पोलीसांनी संशयित हालचाली करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेत तपासणी केली असता त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत राऊंड मिळून आले. त्यानंतर त्याला तात्काळ अटक करण्यात आली.

    अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सिद्धार्थ अनिल बोराडे (वय २०, रा. ज्ञानेश्वर नगर, तळेगाव दाभाडे) असे आहे. पोलीसांनी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता तो सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्याच्यावर यापूर्वीही शिवाजीनगर पोलीस ठाणे तसेच तळेगाव दाभाडे येथे बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    सध्या आरोपीकडे मिळालेले गावठी पिस्तुल नेमके कोठून आणि कोणाकडून मिळाले याचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. ही कारवाई सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांच्या नेतृत्वात गुन्हे तपास पथकाने केली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा