• Thu. Mar 12th, 2026

    अजिंठा-वेरूळ येथे सर्व यंत्रणांनी पायाभूत सेवा-सुविधा समन्वयाने उपलब्ध कराव्यात–विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 12, 2026
    अजिंठा-वेरूळ येथे सर्व यंत्रणांनी पायाभूत सेवा-सुविधा समन्वयाने उपलब्ध कराव्यात–विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर – महासंवाद

    छत्रपती संभाजीनगर, दि. १२ (विमाका) : जागतिक वारसास्थळ असलेल्या अजिंठा-वेरूळ लेण्यांच्या विकास प्रकल्पांतर्गत उद्भवणाऱ्या समस्यांचे तातडीने निराकरण करून देश-विदेशातील पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले.

    अजिंठा-वेरूळ विकास प्रकल्पातील पर्यटनाशी संबंधित समस्यांबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व नोडल अधिकारी नीलेश गटणे, प्रादेशिक व्यवस्थापक योगेश निरगुडे, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक विजय जाधव, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, स्थानिक शॉपिंग प्लाझाचे व्यवस्थापक, लेणी संघटनांचे पदाधिकारी आणि पर्यटन अभ्यासक उपस्थित होते.

    बैठकीत श्री. पापळकर यांनी अजिंठा-वेरूळ विकास प्रकल्पातील पर्यटन समस्यांचा आढावा घेत स्थानिक प्रशासन व विविध विभागांनी पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा व सुरक्षा देण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

    त्यामध्ये प्रमुखतः अजिंठा टी-पॉइंट ते अजिंठा लेणी पायथा या सुमारे 4 किमी अंतरासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामार्फत सुरू असलेली प्रदूषणमुक्त बस सेवा पर्यटन हंगामात अपुरी पडते. त्यामुळे पर्यटकांना लेणी न पाहताच परत जावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाने तातडीने अधिक ई-बस सेवा उपलब्ध कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

    तसेच टी-पॉइंट ते लेणी पायथा या मार्गावरील खराब झालेल्या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी, तसेच रस्त्यालगत वाढलेल्या झाडांच्या फांद्या वन विभागाने वेळोवेळी छाटाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

    पर्यटकांच्या सोयीसाठी अजिंठा टी-पॉइंट शॉपिंग प्लाझा व अजिंठा गेस्ट हाऊस, फर्दापूर येथे सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच अजिंठा व्ह्यू पॉइंट, अजिंठा पर्यटक निवास, विहारा उपहारगृह, अजिंठा उपहारगृह लेणी आणि पायथ्याजवळील अजिंठा अभ्यागत केंद्र येथे उन्हाळ्यात पिण्याचे व वापरण्याचे पाणी उपलब्ध राहण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

    वेरूळ लेणी परिसरात पर्यटकांना हॉकर्सपासून संरक्षण मिळावे यासाठी पोलीस विभागामार्फत पोलीस चौकी उभारणे, वेरूळ लेणी ते घृष्णेश्वर मंदिर मार्गावरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटविणे आणि सुलभ वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता जलदगतीने पूर्ण करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.

    जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अजिंठा लेणी परिसरातील पिण्याचे पाणी, वीज व रस्त्यांसाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले.

    दरम्यान, अजिंठा-वेरूळ येथे काहीजण व्हीव्हीआयपी असल्याचे सांगून नियम मोडून प्रवेश मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणतात. तसेच काही बिनपरवाना मार्गदर्शक पर्यटकांना चुकीची माहिती देतात. याबाबत तक्रार मिळाल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. विनय राठोड यांनी स्पष्ट केले.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed