म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिराचा खटला २००८ आणि २०११ ला सर्वोच्च न्यायालयात आला असता, श्रीराम जन्मभूमीचे पुरावे तत्कालीन काँग्रेस सरकारकडे मागितले गेले. हे पुरावे मागितल्यावर काँग्रेसच्या वकिलांनी रामलल्ला काल्पनिक असल्याचे सांगितले; पण त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आल्यावर जन्मभूमीचे पुरावे दिले. त्यानंतर श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी परवानगी मिळाली. मोदी सरकार आल्यानेच राममंदिर साकारले गेले,’ असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी व्यक्त केले.
पुण्यातून अयोध्यासाठी पहिली ‘आस्था’ रेल्वे मंगळवारी सायंकाळी १४०० भक्तांना घेऊन रवाना झाली. त्या वेळी बावनकुळे बोलत होते. या प्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, धीरज घाटे, माधव भांडारी, वासुदेव काळे आदी उपस्थित होते.
‘श्रीराम मंदिर साकारल्याबद्दल जगभरातील हिंदू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत आहेत. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण मिळूनही उद्धव ठाकरे गेले नाहीत. त्यामुळे ठाकरेंचे बेगडी प्रेम आणि हिंदुत्व जनतेच्या लक्षात आले,’ असा आरोपही बावनकुळे यांनी केला.