मंगळवारी मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजेवाडी फाट्याजवळ औदुंबर ट्रॅव्हल्सची लक्झरी बस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. औदुंबर ट्रॅव्हल्सची MH 08 9779 क्रमांकाची लक्झरी बस रत्नागिरीवरुन मुंबई येथे निघाली होती. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील राजेवाडी फाट्याजवळ आली असता बसचा टायर गरम होऊन फुटल्याने लक्झरी बसने पेट घेतला. आग लागल्याचे चालक गुलशन पठाण याच्या लक्षात येताच लक्झरी बस रस्त्याच्या साईडला घेऊन सर्व प्रवाशांना बस मधून खाली उतरवण्यात आले. यावेळी बस मध्ये दोन चालकांसह २२ प्रवाशी प्रवास करीत होते.
चालकाच्या प्रसंगावधानामुळे लक्झरी बसमधील सर्व प्रवासी बचावले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचेपर्यंत भीषण आगीत लक्झरी बस पुर्णतः जळून खाक झाली. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राठोड करीत आहेत.