सातारा येथे राष्ट्रवादी भवनात महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी रोहिणी खडसे दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पक्षाला मिळणारा प्रतिसाद चांगला आहे. महागाईमुळे महिला असंतुष्टतेचे वातावरण आहे. त्यामुळे महिला शरद पवार गट राष्ट्रवादीत येऊ लागल्या आहेत. आमच्याकडे महिलांमध्ये मतभेद नाहीत, मनभेद आहेत. त्यातून महिला व्यक्त होत असून त्यांच्या भावना समजून येत आहेत, त्याचा आम्हाला आनंद आहे. महागाई, बेरोजगारीमुळे महिलांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. अत्याचाराच्या घडल्या तरी कार्यवाही होत नाही. देशातही अशीच परिस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील महिला मल्लांना पारितोषिके परत करावे लागणे, हे दुर्दैवी आहे, असे सांगून नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादीतील फुटीबाबत प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, पक्ष फोडणे हे लोकशाहीला घातक आहे. आम्ही विचारधारेच्या विरोधात लढण्यासाठी खंबीर आहोत. दबावतंत्राच्या या विचारधारेविरोधात राष्ट्रवादी खंबीरपणे उभा आहे. मोदी सरकारविराधोत खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे दौरे सुरू आहेत.
सध्या स्वकियांपेक्षा भविष्यात आमच्यासमोर भ्रष्ट जुमला पार्टीचेच आव्हान आहे. देशात व राज्यात त्यांनीच पक्ष फोडाफोडीचे राजकारण केले आहे. त्यामुळे वातावरण गढूळ गेले आहे. त्यांच्या विचारधारेविरोधात आम्ही लढणार आहोत. आज राष्ट्रवादीतून जे भाजपमध्ये गेलेत, ते किती दिवस त्यांच्याबरोबर राहतील हे आपल्याला पाहायला मिळेल. मात्र, सोडून गेलेल्यांना शरद पवार सोडत नाहीत, त्यांना निवडणुकीत पडणारच,’ असा थेट इशारा अजित पवार गटालाही दिला आहे.
सध्या राष्ट्रवादीतून अनेकजण पक्ष सोडून गेल्याबाबत विचारले असता रोहिणी खडसे म्हणाल्या, खासदार शरद पवार यांची ज्यांनी साथ सोडली, ते पुन्हा निवडून आले नाहीत, हा इतिहास आहे. २०१९ मध्येही याची प्रचिती आली असल्याचे यावेळी खडसे म्हणाल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला आघाडीच्या नेत्या कविता म्हेत्रे, संगीता साळुंखे, समिद्रा जाधव, संजना जगदाळे, दीपक पवार, राजकुमार पाटील उपस्थित होते.