• Sat. Sep 21st, 2024

श्रीकाळाराम मंदिरात आज महापूजा; उद्धव ठाकरे राहणार उपस्थित, गोदाआरतीचेही आयोजन

श्रीकाळाराम मंदिरात आज महापूजा; उद्धव ठाकरे राहणार उपस्थित, गोदाआरतीचेही आयोजन

म.टा.प्रतिनिधी, नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून (दि. २२) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते सायंकाळी काळारामाची पूजा आणि गोदाआरती होणार आहे. उद्या, मंगळवारी (दि. २३) शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार असून, त्यात दीड हजार शिवसैनिक सहभागी होणार आहेत.

या अधिवेशनात आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार असून, ठरावांसह काही महत्त्वाचे निर्णयही घेतले जाणार आहेत. आज, सोमवारी अयोध्येत श्रीरामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. प्रभू रामांचे बराच काळ नाशिकमध्ये वास्तव्य राहिल्याने या सोहळ्याचे औचित्य साधून शिवसेनेच्या ठाकरे गटाने सोमवारी काळारामाचे पूजन आणि गोदावरी आरतीचे नियोजन केले आहे. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंसह शिवसेनेचे प्रमुख नेते आज दुपारी नाशिकमध्ये दाखल होणार असून, ते दोन दिवस नाशिक मुक्कामी राहणार आहेत. भगूर येथील सावरकरवाड्यात दुपारी चार वाजता स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केल्यानंतर तेथील लोकांशी ठाकरे संवाद साधणार आहेत. सायंकाळी ते काळारामाचे दर्शन घेणार असून, त्यानंतर रामकुंडावर गोदावरीची आरती होणार आहे. मंगळवारी (दि. २३) त्र्यंबकेश्वररोडवरील डेमोक्रसी हॉटेलमध्ये सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. यानंतर सायंकाळी सहा वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे कार्यकत्यांत उत्साह संचारला आहे. प्रभूरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे शहर भगवेमय झाले आहे.

‘श्रद्धेने रामांची पूजा करणार’

शनिवारी सायंकाळी नाशिकमध्ये दाखल झालेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी ठाकरेंच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेतला. महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, सुनील बागूल, विजय करंजकर, विलास शिंदे यावेळी उपस्थित होते. अयोध्येत राम मूर्तीची प्रतिष्ठापना होत असून, भाजपच हा सोहळा करीत असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले आहे. आम्ही असू तेथे श्रद्धेने श्रीरामांची पूजा करणार असल्याचे राऊत म्हणाले. अयोध्येतील शरयूतीरावर शिवसेनेनेच आरतीचा भव्य सोहळा सुरू केला. नाशिकमध्येही सोमवारी गोदाआरतीचा सोहळा होणार असून, त्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती राऊत यांनी माध्यमांना दिली. सावरकरांना अभिवादन, काळारामाचे पूजन आणि गोदाआरती हे आमच्या राष्ट्रीय अस्मितेचे सोहळे आहेत. अयोध्येतील कार्यक्रमाचे आमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिले गेले नाही, परंतु, आम्ही त्यांना काळारामाच्या आरतीसाठी निमंत्रित केल्याचे संजय राऊत म्हणाले. त्यानंतर त्यांनी भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वाड्यालाही भेट दिली.
प्रभूराम त्यांना आशीर्वाद नव्हे, तर शाप देतील! निमंत्रणावरुन खासदार संजय राऊत यांची टीका
‘दार उघड बये दार उघड’

मंगळवारी (दि. २३) जानेवारीला शिवसेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन हॉटेल डेमोक्रसी येथे होत असून, त्यामध्ये दीड हजार शिवसैनिक सहभागी होणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. बाबरी मशिद घटनेशी संबंधित कारसेवकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनही या अधिवेशनाच्या ठिकाणी पाहता येणार आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून पक्ष स्तरावर लोकसभा व विधानसभा निवडणुकीशी संबंधित काही निर्णय होणार असून, ‘दार उघड बये दार उघड’ असे आवाहन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed