राज्यातील ४८ लोकसभा क्षेत्रांपैकी प्रत्येक क्षेत्रातून चार हजार नागरिकांना अयोध्यावारी घडवण्यात येणार आहे. सोमवारी, २९ जानेवारीला भाविकांसह पहिली रेल्वे अयोध्येसाठी रवाना करण्यात येणार असून मार्चपर्यंत विशेष रेल्वेगाड्या सुरू राहणार आहेत. अयोध्यावारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकांकडून एक हजार रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे. यात मुंबई-अयोध्या-मुंबई असा रेल्वे प्रवास, अयोध्येत राहण्याची-जेवणाची व्यवस्था आणि रामलल्लाचे दर्शन यांचा समावेश आहे, असे प्रदेशाध्यक्ष संजय पांडेय यांनी सांगितले. मध्य रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष रेल्वेगाडीच्या सूटण्याच्या वेळाबाबत विचारले असता, अद्याप विशेष रेल्वेगाडीबाबत कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबईतील लोकसभा क्षेत्रातील रेल्वेगाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे येथून रवाना होतील. नाशिक, पुणे, नागपूर अशा रेल्वे स्थानकांतून संबंधित लोकसभा क्षेत्रातील रेल्वेगाड्या धावणार आहेत, असे ही संजय पांडेय यांनी स्पष्ट केले आहे.