ते म्हणाले, “विजेत्या बैलांवर गुलाल उधळणे बंद करा. शर्यत करा; पण त्यातून बैलांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. तुम्ही उधळलेला गुलाल त्यांच्या डोळ्यात जाऊन त्यांना त्रास होतो. आपल्याला गुलाल उधळल्यावर डोळे बंद करायचे कळते,त्यांना कळत नाही. त्यामुळे गुलाल डोळ्यात गेल्यावर त्रास होतो. बैलांना हे कळत नाही. ज्या बैलांमुळे तुम्ही जिंकता आणि त्याच बैलांना उत्साहाच्या भरात त्रास देता, हे बरोबर नाही. मला प्राण्यांना त्रास झालेला आवडत नाही. बैल घाबरलेले दिसत आहेत. त्यांच्या डोळ्यात आनंद, प्रेम, राग दिसतो. तुम्ही एकमेकांवर गुलाल उधळून जल्लोष करा… पण बैलांवर गुलाल उधळू नका.”
कोरेगाव येथे झालेल्या ‘एक आदत एक बैल’ बैलगाडी शर्यतीत गोडोली (सातारा) येथील अक्षय शिवाजी गिरी यांचा ‘बलमा’ आणि शिरसाठवाडी येथील भाऊ भुजबळ यांचा ‘सुंदर’ या बैलांच्या गाडीने ‘मनसे केसरी २०२३’ किताब पटकावला. या गाडीला हिरो कंपनीच्या दोन दुचाकी बक्षीस दिल्या. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.
या शर्यतीत ५०७ सहभागी झाल्या होत्या. ५८ फेऱ्या आणि नऊ उपांत्यपूर्व फेरी झाल्या. बैलगाडी शर्यतीत आई गावदेवी प्रसन्न गुड्डी रतन म्हात्रे व अक्षय राजेंद्र गिरी (सातारा) यांच्या बैलगाडीने द्वितीय क्रमांक मिळवत हिरो कंपनीची एक दुचाकी बक्षीस पटकावली. संत बाळू मामा प्रसन्न हर्षलभाऊ पायगुडे ( कुडजे) यांच्या बैलगाडीने तृतीय क्रमांक मिळवत ५१ हजार, राजनंदिनी नंदू सागडे (गराडे) यांच्या बैलगाडीने चतुर्थ क्रमांकासह ३१ हजार, रणजित खाडे पोलिस (पळशी) यांच्या बैलगाडीने पाचव्या क्रमांकासह २१ हजार रुपये बक्षीस पटकावले.