पश्चिम बंगाल येथील कापड व्यावसायिक वासिम मुस्तर हे झारखंड येथे आपल्या बहिणीकडे गेले होते. झारखंड येथे एका चहाच्या टपरीवर असताना त्यांची ओळख शहाबाज अली याच्यासोबत झाली. शहाबाज या टपरीवर हज यात्रेबाबत बोलत होता. ते वासिम यांनी ऐकले होते. यावर त्यांनी शहाबाजला विचारले असता त्याने, मुस्लिम भाविकांना वाजवी दरामध्ये हज येथे पाठविण्याची व्यवस्था करणाऱ्या तो मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या ट्रॅव्हल एजन्सीची माहिती दिली. चेंबूर येथे सलीम कुरेशी यांचे अल कुरेशी ट्रॅव्हल्स असल्याचे सांगत त्याने संपर्क क्रमांक दिला. वासिम यांनी सलीमला मोबाइलवर संपर्क केला. त्यावेळी हज यात्रेबाबत जाणून घ्यायचे असल्यास चेंबूर येथे या, असे सलीमने सांगितले. त्यानुसार वासिम मुंबईत आले आणि चेंबूरमधील अल कुरेशी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात पोहोचले.
वासिम मुस्तर हे कार्यालयात पोहोचले त्यावेळी सलीम कुरेशी यांच्यासह त्यांची पत्नी, मुले, मॅनेजर शहाबाज अली असे चार ते पाच जण उपस्थित होते. या सर्वांनी वासिम यांना हज येथील यात्रेच्या नियोजनाबाबतची माहिती दिली. वासिम यांनी आपल्या गावातील ४० जण हज येथे जाण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले. सर्वांचे मिळून २४ लाख रुपये होतील, असे सांगून ७५ हजार रुपये आगाऊ भरण्यास सांगितले.
वासिम यांनी मॅनेजरच्या खात्यावर ऑनलाइन ही रक्कम पाठवली. त्याचप्रमाणे गावातील ४० जणांचे पासपोर्ट कुरियरमार्फत अल कुरेशी ट्रॅव्हल्सच्या पत्यावर पाठविले. थोडे थोडे करून सलीम याला २४ लाख रुपये पाठवण्यात आले. त्यानंतर सलीम याने त्यांना सौदी अरेबिया या थ्री स्टार हॉटेलची बुकिंग पावती आणि विमानाची तिकिटे पाठवली. काही दिवसांनंतर वासिम यांनी हजला जाण्यासाठी व्हिसाबाबत सलीमकडे विचारणा केली असता तो चालढकल करू लागला. त्यामुळे वासिम यांनी हॉटेल बुकिंग आणि विमानाची तिकिटे तपासली. हॉटेल बुकिंग आणि विमानाची तिकिटे बनावट असल्याची स्प्ष्ट होताच आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
सलीमला पैसे परत करण्यासाठी संपर्क केला असता त्याच्या पत्नीने फोन घेतला आणि सलीम आजारी असून तो बरा झाल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत, असे सांगितले. आपली आणि इतर भाविकांची आर्थिक फसवणूक झाल्याने वासिम यांनी सलीम, शहाबाज आणि इतर तिघांविरुद्ध चेंबूर पोलिस ठाण्यात तक्रार केली.
Read Latest Maharashtra News And Marathi News