संपूर्ण राज्यातील शेतकरी दुष्काळ, पाणीटंचाई व अवकाळीचे चटके भोगत असताना आम्ही चहापान कार्यक्रमास उपस्थित राहणे हा संकटात होरपळत असलेल्या शेतकऱ्याप्रती द्रोह ठरेल. त्यामुळे महाविकास आघाडीने सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केले. बुधवारी रविभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू, शेकापचे जयंत पाटील, आमदार राजेश राठोड उपस्थित होते.
राज्यातील विविध प्रश्नांवर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, राज्यावरील वाढलेले कर्ज, शेतकऱ्यांची दैन्यावस्था, शेती क्षेत्राची दुरावस्था, शासकीय रुग्णालयात मृत्यूतांडव, राज्यातील पाणीटंचाई परिस्थीती, स्मारकांची स्थिती, आरक्षणाबाबतची असंवेदनशीलता, अल्पसंख्यांकाबाबत नकारात्मक दृष्टीकोन, कंत्राटी भरती व बेरोजगारीमुळे युवकांमधील वाढता रोष, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, सरकारची प्रसिध्दीची हाव, स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक, अंतर्गत सत्ता स्पर्धेचे दुष्परीणाम अशा अनेक समस्या असताना सरकार चहापान कार्यक्रम करत आहे. यावरून सरकार फारसे गंभीर नसल्याचे दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दंगलीचे राज्य
महायुती सरकारच्या काळात पुरोगामी महाराष्ट्र ओळख दंगलग्रस्त महाराष्ट्र अशी झाली आहे. केंद्रीय गृह खात्याचा नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालाचा दाखला देताना वडेट्टीवार म्हणाले, २०२२ मध्ये राज्यात ८ हजार २१८ दंगलीच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. दंगलींबरोबरच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांध्ये वाढ झाली आहे. गृहमंत्र्यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपूरची ओळख चोरांची राजधानी अशी झाली असल्याची टीका वडेट्टीवार यांनी यावेळी केली.
सरकार केवळ ‘इव्हेंट’मध्ये व्यस्त
राज्यातील गुन्हेगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. आरोग्य विभागात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. आरक्षणावरून दोन समाजात दुही निर्माण झाली असताना राज्य सरकारला त्याच्याशी काहीही घेणे देणे नाही. याऊलट स्वताचे अपयश झाकण्यासाठी जनतेची कामगिरी न करता जाहिरातबाजीवर भर देण्यात येत आहे. जनतेच्या निधीची उधळपट्टी करून ‘शासन आपल्या दारी’ हा इव्हेंट करून सरकारच्या खोट्या कामगिरीचा प्रचार करण्यात येत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी यावेळी केला.