पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना लोहार सापडले
लाचलुचपत प्रतिबंधक विभागात उपअधीक्षक म्हणून संजीव पाटील होते.त्यावेळी त्यांच्या कडे तक्रारदारांनी तक्रार केली होती.त्यांच्या शिक्षण संस्थेत आठवी ते दहावी वर्गवाढ करण्यासाठी अर्ज दिला होता. यु डाईस प्रणालीमध्ये याची नोंदणी करण्यासाठीचा प्रस्ताव इथून पुण्याला शिक्षण सहसंचालकांकडे पाठविण्यासाठी किरण लोहार यांनी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.यानंतर तक्रारदार व्यक्ती आणि किरण लोहार यांच्यात तडजोडी झाली होती.किरण लोहार यांनी पंचवीस हजार रुपये स्वीकारण्यास मान्यता दर्शविली होती. याबाबतची तक्रार मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक महाडिक आणि पोलीस निरीक्षक कोळी यांनी पडताळणी केली. यात लाचेची मागणी झाल्याचं समोर आलं. यानंतर तक्रारदार व्यक्तीकडून प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना २५ हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक केली होती.अटक झाल्या नंतर अँटी करप्शन ब्युरोचे अधिकारी सतत तपास करत होते.
भ्रष्ट आणि गैरमार्गाने संपत्ती पत्नी आणि मुलाच्या नावावर
सोलापूर प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार त्यांची पत्नी सुजाता किरण लोहार व मुलगा निखिल किरण लोहार यांच्याविरूद्ध ६ डिसेंबर २०२३ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा १११.९३ टक्के अपसंपदा आढळली आहे. दरम्यान, लोहार यांनी १५ नोव्हेंबर १९९३ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये भ्रष्ट आणि गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक पाच कोटी ८५ लाख ८५ हजार ६२३ रुपयांची अपसंपदा जमविली आहे. त्यांची पत्नी सुजाता लोहार व मुलगा निखिल लोहार यांनी किरण लोहार यांना भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा व सहाय्य केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
किरण लोहार यांच्यासह कुटुंब देखील अडचणीत
तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार पंचवीस हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ सापडले होते.अँटी करप्शन ब्युरो सोलापूर युनिटने तपास करत वर्षभराच्या आत किरण लोहार यांच्या संपत्ती विषयी माहिती समोर आणली आहे.किरण लोहार यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबा विरोधात देखील गुन्हा दाखल झाला आहे.भ्रष्ट आणि गैरमार्गाने जमवलेल्या संपत्तीमुळे पत्नी आणि मुलगा देखील अडचणीत आले आहेत. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे. उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई व गुन्हा झाला आहे.
तुकाराम सुपे आणि विष्णू कांबळे यांच्यावरही गुन्हा दाखल
किरण लोहार यांच्यासह तुकाराम सुपे यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झाला आहे. ते टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी चर्चेत आले होते. याशिवाय सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे आणि त्यांच्या पत्नी जयश्री कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News