महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरी हंगामास गेल्या महिन्यात प्रारंभ झाला असून, स्ट्रॉबेरीचे उत्पादनही सुरू झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे गेल्या आठ दिवसांपासून शेतकरी चिंताग्रस्त आहे. त्याचा परिणाम फळ उत्पादनावर झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे छोटी फळे लवकर पिकत असल्याने ते मार्केटमध्ये लवकर विक्रीसाठी आणले जात आहे. मात्र, सर्वत्रच परिस्थिती अशी निर्माण झाल्याने आवक वाढ होऊन दर घटला आहे. झालेल्या अवकाळी पावसामुळे स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान झाल्याने त्याचा आर्थिक फटकाही शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
आज रात्री भिलारनजीक असलेल्या कासवंड येथील एकनाथ महादेव गोळे यांच्या स्ट्रॉबेरी शेतात गव्याच्या काळपाने धुडगूस घालून एकरभर शेतीचे नुकसान केले आहे. त्यातच आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतातील स्ट्रॉबेरी, गहू पिकही खाल्ले आहे. हातातोंडाशी आलेली पीक ऐन हंगामात खाल्ल्याने शेतकऱ्याचे आर्थिक घडी कोलमडणार आहे. या परिसरातील शेतकऱ्यांची आर्थिक सुबत्ता ही स्ट्रॉबेरी पिकावरच अवलंबून आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे साधारण तीन ते चार लाखाचे नुकसान झाले आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून या परिसरामध्ये बिबट्याचाही वावर असल्याने शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. वन विभागाने या परिसरातील घटनांकडे गांभीर्याने पाहून उपाययोजना कराव्यात. त्याचप्रमाणे शेती पिकाचे संरक्षण व्हावे, यासाठी वन हद्दीत तार कंपाऊंड करावे. नुकसान झालेल्या स्ट्रॉबेरी पिकाचा पंचनामा करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.