दार्जिलिंग येथे लैंगिक तस्करीविरोधात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रंगू सौरिया यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे यंदाचा बाया कर्वे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या बुधवारी (२९ नोव्हेंबर) प्रसिद्ध अभिनेते आणि माजी खासदार नितीश भारद्वाज यांच्या हस्ते रंगू सौरिया यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. संस्थेच्या कर्वेनगर येथील रमा पुरुषोत्तम विद्या संकुल येथील ॲम्फी थिएटरमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमात बाया कर्वे लिखित ‘माझे पुराण’ या मूळ मराठी पुस्तकाच्या ‘मेरी गाथा’ या हिंदी आणि ‘द सागा ऑफ माय लाइफ’ या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन होणार आहे. तसेच बाया कर्वे पुरस्कारप्राप्त महिलांच्या कार्यावर आधारित ‘कर्त्या करविता’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव आणि सचिव पी. व्ही. एस. शास्त्री या वेळी उपस्थित होते.
सिलीगुडी येथील कांचनजंगा उद्धार केंद्र संस्थेच्या संस्थापक रंगू सौरिया या दार्जिलिंग, ईशान्य भारत आणि नेपाळमधील लैंगिक तस्करी पीडितांसाठी कार्यरत आहेत. संस्थेच्या माध्यमातून त्यांनी देशभरातील विविध शहरांमधून अकराशेहून अधिक मुलींची सुटका केली आहे. यामध्ये अरब देशांमध्ये गेलेल्या आणि सौदी अरेबियातील स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने भारतात परत आणलेल्या मुलींचाही समावेश आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News