अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या पुढाकाराने भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे दि. २५ आणि दि. २६ नोव्हेंबर असे दोन दिवस भारतातील सर्वात मोठे देशी गोवंश आणि अश्व प्रदर्शन तसेच पशू आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. या पशुप्रदर्शनामध्ये खिल्लार, देवणी, लालकंधारी, थारपारकर, म्हैस, रेडा, कांकरेंज, गीर, डांगी, साहिवाल, पुंगनूर, मालनाड गिड्डा, कपिला गाय बैल तसेच मारवाडी आणि भीमथडी अश्व मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे क्रमांक काढण्यात येणार आहेत.
पहिल्या क्रमांकाच्या गोवंश आणि पशूंचे ‘रॅम्प वॉक’ होणार आहे, असा प्रयत्न भारतात प्रथमच होत आहे. मूळचा राजस्थानी असलेल्या या घोड्याचं नाव आहे फ्रेंजेड जी. हा मारवाडी प्रकारचा घोडा आहे. फ्रेजेंडचा खुराक जाणून तुम्हालाही धक्का बसेल. घोडा मालक युवराज जडेजाने सांगितले की, हा घोडा १५ लीटर दूध पितो. दररोज ५ किलो हरभरा आणि ५ किलो डाळी खातो. हा फक्त ‘मिनरल वॉटर’च पितो. फ्रेजेंड हाइब्रिड असल्याचे घोडा मालक सांगतात. फ्रेजेंडचे वडील राजस्थानी, तर आई रत्नागिरी प्रजातीची आहे. तो ४ वर्षांचा असून गेल्या दीड वर्षांपासून युवराजसोबत आहे. फ्रेजेंडने आतापर्यंत गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तसेच तब्ब्ल ११०० हुन स्पर्धांमध्ये तो विजेता ठरला आहे. आजपर्यंत एकाही घोड्याने त्याचा पराभव केलेला नाही.
युवराज हे व्यवसायाने जमीनदार आणि आडतदार आहेत. ते गुजरातचे रहिवासी आहेत. फ्रेंजेडच्या देखभालीवर दरमहा अडीच ते तीन लाख रुपये खर्च होत असल्याचे त्यांनी सांगितले. घोड्याची काळजी घेण्यासाठी चारजण नेहमी सोबत राहतात. घोड्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी खास रुग्णवाहिकेसारखी गाडी असते. घोड्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी २४ तास एक डॉक्टरही तैनात असतो.