• Sat. Jun 6th, 2026
    नाशिकला गारपिटीचा तडाखा! काढणीला आलेल्या पिकांना फटका बसण्याची भीती, बळीराजा संकटात

    Unseasonal Rain Damage: जायगाव घाटाच्या पायथ्याशी तसेच मोह शिवारात काही ठिकाणी गारपीट झाल्याची माहिती आहे. नायगाव पट्ट्यात विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला, असे शेतकऱ्यांनी सांगितले. साडेतीन ते चार या वेळेत पावसाचा जोर अधिक होता.

    नाशिकला गारपिटीचा तडाखा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    नाशिक : जिल्ह्यात नाशिकरोडसह सिन्नर, निफाड, पिंपळगाव, दिंडोरी सटाणा, कळवण परिसरात बुधवारी (दि. १८) दुपारी गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. यामुळे काढणीला आलेलेल्या गहू, हरभरा आणि कांदा पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

    सिन्नर शहरासह परिसरात दुपारी चारच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. उकाडा वाढल्याने पावसाची चिन्हे दिसत होती. त्यानंतर अचानक पावसाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी पाच ते सात मिनिटे गाराही पडल्या.

    दरम्यान, सिन्नर शहरातील सरदवाडी उपनगरात झालेल्या पावसामुळे सरदवाडी रस्त्यावर वाजे लॉन्स परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. गुडघाभर पाण्यातून वाहनचालकांना वाट काढावी लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही गल्ल्यांमधूनही पाणी वाहत होते. सिन्नर शहरापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावरील काही भागांतही पावसाच्या सरी कोसळल्या. मोह, वडझिरे, नायगाव, जायगाव, देशवंडी, चिंचोली, माळेगाव, दातली तसेच परिसरातील काही गावांमध्ये दुपारी तीन ते पाच या वेळेत पावसाने हजेरी लावली.

    Maharashtra TimesNashik Tapovan: तपोवनात अंधश्रद्धेचा बाजार! झाडांना फोटो, बिब्बे अन् बाहुल्या लावून जादूटोणा, पर्यावरणप्रेमींचा संताप
    कळवणला गारपीट
    कळवण : शहर व तालुक्यात गारांसह अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सायंकाळी सहा वाजता अवघा पंधरा मिनिटे गारांसह झालेल्या पावसामुळे कांदा, मिरची, टमाटे, डाळिंब, द्राक्ष, गहू व भाजीपाला पिकांना फटका बसणार आहे. आधीच शेतमालाला योग्य व अपेक्षित बाजारभाव मिळत नसून, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. बँका, पतसंस्था यांना मार्च महिना वसुलीसाठी अत्यंत महत्वाचा असतांना झालेला अवकाळी व गारपिटीचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.

    Maharashtra TimesAshok Kharat : महिलेवरील अत्याचार प्रकरण; ज्योतिषी अशोक खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी, नाशिक सत्र न्यायालयाचा निर्णय
    बागलाण परिसराला तडाखा
    सटाणा : बागलाण तालुक्यातील पश्चिम भागातसह मोसम परिसरात आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसाचा सर्वाधिक परिणाम कांदा आणि डाळिंब बागांवर झाला असून, अनेक ठिकाणी गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांद्याच्या पिकावर गारांचा मारा झाल्याने पिके आडवी पडली असून, साठवणुकीसाठी तयार असलेला कांदाही खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, डाळिंब बागांमध्ये फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, पंचनामे करण्याची मागणी होत आहे.

    पिकांना फटका बसणार
    निफाड : तालुक्यात बुधवारी दुपारनंतर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या, तर काही ठिकाणी तुरळक गारा झाल्या. दुपारी ४ वाजेच्या दरम्यान चांदोरी, पिंपळगाव बसवंत, ओढा, ओझर, चितेगाव, लासलगाव या भागात पाऊस झाला. लासलगाव शहरात ५ वाजेच्या दरम्यान तुरळक गारांचा पाऊस झाला. सध्या शेतकरी गहू काढण्याचे काम करत आहे. तसेच काही ठिकाणी उन्हाळ कांदा काढण्याचेही सुरू आहे. तर, द्राक्षांचे हार्वेस्टिंग सुरू आहे. या पावसामुळे या पिकांना फटका बसणार आहे.

    दृष्टिक्षेपात गारपीट…

    -सिन्नर शहरासह परिसरात बुधवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत पावसाचा दणका
    -जायगाव घाटाच्या पायथ्याशी, तसेच मोह शिवारात गारपीट
    -निफाडमध्येही तुरळक गारपीट
    -कळवणला शहर व तालुक्यात गारांसह अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल
    -कांदा, मिरची, टोमॅटो, डाळिंब, द्राक्ष, गहू व भाजीपाला पिकांना फटका
    -बागलाण तालुक्यातील पश्चिम भागासह मोसम परिसरात गारपिटीचा तडाखा
    -कांदा आणि डाळिंब बागांना फटका, कांद्याची पिके आडवी

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा