• Sat. Sep 21st, 2024

नवी मुंबई मेट्रोच्या सेंट्रल पार्क स्थानकाला मिळाले नाव, स्थानिकांच्या मागणीनंतर सिडकोचा मोठा निर्णय

नवी मुंबई मेट्रोच्या सेंट्रल पार्क स्थानकाला मिळाले नाव, स्थानिकांच्या मागणीनंतर सिडकोचा मोठा निर्णय

म. टा. वृत्तसेवा, पनवेल : आठवडाभरापूर्वी सुरू झालेल्या नवी मुंबईच्या मेट्रोच्या ‘सेंट्रल पार्क’ स्थानकाच्या नावाचा नामविस्तार करण्यात आला आहे. या स्थानकाचे ‘सेंट्रल पार्क मुर्बीपाडा’ असे नामकरण करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. या स्थानकाचे नाव बदलण्यासाठी स्थानिकांनी आंदोलन केले होते. मेट्रो सुरू झाली, त्याच दिवशी फलकाचे स्टिकर लावून ही मागणी करण्यात आली होती.

शहरांचा पसारा वाढत चालल्यामुळे भौगोलिकदृष्या गावे लहान वाटू लागली आहेत. सिडकोने विकसित केलेल्या शहरांना गावांची नावे दिली, परंतु लहान गावांचे अस्तित्व हरवत चालले आहे. त्यामुळे गावांचे अस्तित्व टिकवून ठेवून गावाची अस्मिता जपण्यासाठी स्थानिकांकडून धडपड केली जाते. पनवेलमधील नवी मुंबई मेट्रोच्या खारघरमधील ‘सेंट्रल पार्क’ स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी स्थानकांवर फलक लावल्यापासून सुरू होती. मुर्बी गावातील तरुणांनी एकत्र येऊन यासाठी आंदोलन केले होते. मेट्रो सुरू झाल्यानंतर अखेर आठवडाभरातच सिडकोने नामविस्तार करण्याचा निर्णय घेतला.
सातबारामुळे बाराच्या भावात; २ हजारांसाठी महिला तलाठी फसली, ACBकडून अटक, काय घडलं?
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे, या स्थानकाला ‘सेंट्रल पार्क मुर्बीपाडा’ असे नाव देण्यात आले आहे. याबाबत दोन दिवसांत आवश्यक ठिकाणी बदल केले जातील, अशी माहिती सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. मुर्बीपाडा नावाचा समावेश करण्यासाठी आंदोलन करणारे जय ठाकूर यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

हरकती सूचनांकडे पाठ

सिडकोने मेट्रो स्थानकांची नावे ठरवताना काही हरकती व सूचना मागवल्या होत्या. जाहीरपणे केलेल्या या आवाहनाला कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे नावांत कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. परंतु नाव देण्याचे ठरवल्यानंतर स्थानिकांची ही मागणी पुढे आली. त्यामुळेच सिडकोकडून उशिरा हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सिडकोतील सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed