• Wed. Jun 17th, 2026
    Raj Thackeray : ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ वेबसाईट नेमकी काय आहे? राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यात सविस्तर सांगितलं

    Raj Thackeray Maharashtra Next Website: राज यांनी आज पाडवा मेळाव्यात ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ ही नवी वेबसाईट लाँच केली आहे. तरुणांना विकासाचा नवा विचार मांडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

    शिवतीर्थावर राज ठाकरेंनी लाँच केली नवी डेव्हलपमेंट वेबसाईट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ (Maharashtra Next) ही नवी वेबसाईट लाँच केली आहे. सोशल मीडिया आणि राजकारणातील अनावश्यक वादात वेळ न घालवता तरुणांनी विकासात्मक प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. “केवळ कौतुक करण्यापेक्षा ठोस आणि नवे विचार मांडा,” असे सांगत राज ठाकरे यांनी या वेबसाईटची घोषणा केली. सामान्य नागरिकांच्या संकल्पना तज्ज्ञांमार्फत सरकारपर्यंत पोहोचवणारा एक दुवा म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

    विकास आराखडा आणि १२ वर्षांचा प्रवास

    यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “ते विकास आराखड्याचं काय झालं, कुठपर्यंत आलं? प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये असताना किंवा नंतर हे प्रश्न असायचेच. २०१४ मध्ये जेव्हा ब्लूप्रिंट आणली, तिथपासून आज २०२६ या क्षणापर्यंत मला एकाही पत्रकाराने हा प्रश्न विचारला नाही की, त्या ब्लूप्रिंटमध्ये नेमकं आहे काय? कारण ती वाचण्यात कोणाला इंटरेस्ट नव्हता, फक्त हिणवण्यात होता. असो, काळ लोटला आणि आज त्या गोष्टीला जवळपास १२ वर्षे होऊन गेली आहेत. त्यावेळेला अनेक तज्ज्ञांना बरोबर घेऊन अनेक गोष्टी त्यामध्ये मांडल्या होत्या. गेल्या १२ वर्षांमध्ये महाराष्ट्र खूप बदलला, विचारांतही महाराष्ट्र बदलला.”

    नव्या विचारांसाठी हक्काचे व्यासपीठ

    पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “मी अनेकदा वर्तमानपत्रांत काही लेख वाचत असतो, त्यात अनेक चांगल्या सूचना येतात. नवीन काहीतरी निर्माण करण्यासाठी अनेक संकल्पना मांडल्या जातात. मग मी विचार केला की, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला एक व्यासपीठ उभा करायला लागेल. महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राबाहेरील लोकांना ‘नेमकं काय व्हायला पाहिजे’, ‘काय घडलं पाहिजे’ आणि ‘ते कसं घडलं पाहिजे’, याबद्दल अनेक योजना त्यांच्याकडे तयार आहेत. परंतु या सांगायच्या कुणाला? मांडायच्या कुणाकडे? सरकार म्हणजे नेमकं कोण? बोलायचं कोणाशी? मांडल्यानंतर ते बघणार कोण आहे आणि आम्हाला उत्तर कधी मिळणार? या सगळ्या प्रश्नांचा विचार करून मी एक नवीन वेबसाईट महाराष्ट्राला अर्पण करत आहे.”

    Maharashtra TimesRaj Thackeray : ‘भविष्यात सत्ता हातात घेणार म्हणजे घेणार’, पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं वक्तव्य

    ‘महाराष्ट्र नेक्स्ट’

    “या वेबसाईटवर तुम्ही तुमचे विचार मांडू शकता. पण तिथे ‘जय महाराष्ट्र साहेब’, ‘भावी मुख्यमंत्री तुम्हीच’ असले काहीही चालणार नाही; अशा गोष्टींना तिथे स्थान नाही. तिथे नवा विचार करा. या मोबाईलच्या विळख्यातून बाहेर या, या कर्मणुकीच्या गटारगंगेतून बाहेर या. हा तुम्हा-आम्हालाच महाराष्ट्र उभा करावा लागेल, तुम्हा-आम्हालाच महाराष्ट्र वाचवावा लागेल आणि त्यासाठीच हे पहिले पाऊल आहे. म्हणूनच आज मी तुमच्यासमोर ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ (Maharashtra Next) उभा करत आहे.” असं राज म्हणाले.

    वेबसाईटचे स्वरूप

    “ही वेबसाईट सुरू झाल्यावर तुम्हाला मराठी आणि इंग्रजी असे दोन पर्याय मिळतील. मराठीमध्ये गेल्यावर बाजूला एक ऑडिओ फिल्म आहे, जी ही वेबसाईट कशी वापरायची हे सांगते. आपल्या कल्पना नोंदवण्यासाठी मी २७ विषय दिलेले आहेत. ज्या काही तुमच्या स्वतःच्या कल्पना असतील, जे काही नवीन निर्माण करायचे असेल, ते तुम्ही तिथे मांडू शकता. आम्ही तुमच्यामध्ये आणि सरकारमध्ये फक्त वाहक (Bridge) असू. जर तुमची कल्पना योग्य असेल, तर ती सरकारकडून कशी करून घ्यायची, हे आम्ही पाहू. कारण तुमचे विचार आधी तज्ज्ञांकडे जातील आणि त्या कमिटीकडून मंजूर झाल्यानंतर ते सरकारकडे पाठवले जातील.”

    “वेबसाईटवर या २७ विषयांवर तुम्हाला सूचना मांडता येणार”

    १. शेती २. रस्ते आणि पायाभूत सुविधा विकास ३. आरोग्य सेवा व सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ४. जमीन पायाभूत सुविधा ५. औद्योगिक वसाहती ६. व्यवसाय सुलभता ७. प्रादेशिक औद्योगिक संतुलन ८. सर्वसमावेशक शालेय, उच्च व तंत्रशिक्षण सुधारणा ९. आदिवासी विकास १०. सर्वसमावेशक आणि सशक्त महिला व बाल ११. रोजगार व रोजगार निर्मिती १२. आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्ती पूर्व तयारी १३. औद्योगिक धोरण १४. गुंतवणूक प्रोत्साहन व थेट विदेशी गुंतवणूक १५. स्टार्टअप्स आणि भविष्यवेधी उद्योग १६. ग्रामीण अर्थव्यवस्था आणि ग्रामीण उद्योग विकास १७. शहरांचा शाश्वत विकास १८. क्रीडा व युवा विकास १९. मराठी भाषा, संस्कृती, ज्ञान परंपरेचा विकास २०. पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा २१. हवामान बदल, पर्यावरण आणि प्रदूषण २२. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि विकास २३. औद्योगिक कायदे सुधारणा २४. शाश्वत हरित व पर्यावरण पूरक औद्योगिक विकास २५. सिंचन, जलव्यवस्थापन व जल सुरक्षा २६. समृद्ध स्वावलंबी आणि शाश्वत ग्रामविकास २७. पर्यटन विकास.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा