Raj Thackeray: मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धावरुन केंद्र सरकारनं घेतलेली भूमिका, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तरुणांचे प्रश्न, शहरांची स्थिती यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाष्य केलं. मुंबईतील सभेत बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला.
सध्या जगात युद्धामुळे तेल संकट निर्माण झालं. एरव्ही निवांत असणारे अनेक जण आता गॅसवर आहेत. देशात भीषण परिस्थिती आहे. पण काही गोष्टी आपल्याकडूनही राहून गेल्या. इराण अनेक वर्षे आम्हाला साथ देत होता. काश्मीर प्रश्नावरही इराण आपल्या सोबत राहिला. पण आज आपण त्यांच्या बाजूनं उभे राहिलो नाही. इराणनं आपल्याला कायम रुपयांत दिलं. आता हा देश पुढेही तशाच प्रकारे देईल का माहीत नाही. त्या देशाचा सर्वोच्च नेता मारला गेल्यावरही आपण त्याबद्दल निषेधाचा चकार शब्द काढला नाही, अशा शब्दांत राज ठाकरेंनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली.
आपल्याला करमणुकीत गुंतवून ठेऊन सगळ्या विचित्र गोष्टी सुरु आहेत. आम्ही रस्त्यावर येत नाही. आम्ही सोशल मीडियावर राग व्यक्त करतो आणि गप्प बसतो. आधी लोक रस्त्यावर यायचे. आता सगळेच मोबाईलमध्ये गुंतून राहिले आहेत. या करमणुकीच्या गटारगंगेतून आधी बाहेर या, असं आवाहन राज ठाकरे ंनी केलं. सरकारला कोणी प्रश्नच विचारु नये अशी सगळी योजना आहे आणि हे सगळं जगभर सुरु आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री सांगतात, राज्याचा विकास करतो. अर्थव्यवस्था ३ ट्रिलियन डॉलरवर नेणार. पण आज महाराष्ट्रावर ११ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. २०१४ मध्ये हा आकडा २ लाख कोटी रुपये इतका होता. गेल्या १२ वर्षांत हाच आकडा तब्बल ११ लाख कोटींवर जाऊन पोहोचला. राज्यातील शहरांमधील व्यवस्था कोलमडून पडल्या आहेत. तरुण, तरुणांना शेती करायची नाही. देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. तीन वेळा कर्जमाफी झाली. पण तरीही शेतकरी देशोधडीला लागला आहे. आपण एक राज्य म्हणून आज नेमकं कुठे चाललो आहोत, असा सवाल राज यांनी उपस्थित केला.
