• Sun. Jun 7th, 2026
    Raj Thackeray : ‘भविष्यात सत्ता हातात घेणार म्हणजे घेणार’, पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं वक्तव्य

    MNS Padwa Melava 2026 : शिवतीर्थावरून राज ठाकरेंचा सत्तेचा निर्धार. बाळासाहेबांचा कानमंत्र सांगत राज यांनी मोबाईल आणि रीलच्या विळख्यातून बाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे.

    शिवतीर्थावरून राज ठाकरेंचा सत्तेचा निर्धार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: गुढीपाडवा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा हे आता एक समीकरण बनले आहे. मनसेच्या स्थापनेला १९ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, आज शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) मनसेचा भव्य पाडवा मेळावा पार पडला. रायगडच्या पायथ्याशी ‘साध्या’ पद्धतीने वर्धापन दिन साजरा केल्यानंतर, राज ठाकरे मुंबईत काय तोफ डागणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत राजकीय फटकेबाजी केली आहे.

    गुढीपाडवा आणि मनसेच्या प्रवासाचे २० वे वर्ष

    राज “जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम मी आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. ९ मार्च २००६ ला आपला पक्ष स्थापन झाला आणि १९ मार्च २००६ ला आपली पहिली जाहीर सभा याच शिवतीर्थावर झाली. आज पक्षाला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. आनंदाची आणि भाग्याची गोष्ट अशी की, २० वर्षांनंतर बरोबर १९ मार्चलाच गुढीपाडवा आला आहे, मी याला एक शुभ संकेतच मानतो. निवडणुका आल्या आणि गेल्या, रणशिंग फुंकले गेले, हे सर्व झाले पण आपण जे उभे आहोत, ते महाराष्ट्रासाठी आहोत हे लक्षात ठेवा.”,

    महाराष्ट्राचे गतवैभव आणि सत्तेचा आत्मविश्वास

    “मी आता जे काही बोलतोय, ते तुमच्या टाळ्या मिळवण्यासाठी बोलत नाहीये. महाराष्ट्राचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी मी जो शब्द दिला आहे, त्यासाठी भविष्यात आपण सत्ता हाती घेणारच, हा माझा आत्मविश्वास आहे. सध्या राज्यात पुढची तीन वर्षे कोणत्याही निवडणुका नाहीत, त्यामुळे कंत्राटदारांकडून पैसे खायला सगळे मोकळे झाले आहेत. आज देशातही एक प्रकारची धाकधूक आणि भीषण परिस्थिती आहे.

    Maharashtra TimesDhananjay Munde : ‘महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांनी मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले होते’, धनंजय मुंडे यांचं वक्तव्य

    सर्वसामान्य नागरिकांना साध्या सुविधा मिळणे कठीण झाले असून लोक सध्या तणावाखाली गॅसवर आहेत. खरं तर, काही गोष्टी आपल्याकडूनही राहून गेल्या आहेत.” असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

    ‘बाळासाहेबांचा कानमंत्र”

    पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “आज तुम्ही सर्वजण फुरसतीत आला आहात ना? मग जरा निवांत ऐका. मी ज्यावेळी राजकारणात आलो आणि माझे पहिले भाषण झाले, त्यानंतर मला आदरणीय बाळासाहेबांनी बोलावून काही महत्त्वाची वाक्ये सांगितली होती. ती वाक्ये एखाद्या स्क्रूप्रमाणे माझ्या डोक्यात फिट बसली आहेत. त्यांनी मला सांगितले होते की, “भाषण करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तू काय बोलला यापेक्षा तू लोकांना विचार करायला काय दिले, याला जास्त महत्त्व आहे.” त्यामुळे भाषण करताना माझ्यावर नेहमी एक मानसिक दडपण असते की, आज मी तुम्हाला नवीन काय देऊ? असे काय सांगू, ज्यामुळे तुम्ही आणि हे सरकारही विचार करायला लागेल?”

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा