• Sat. Sep 21st, 2024

Navi Mumbai Metro: नवी मुंबईत अखेर मेट्रो धावली, मेट्रोचं सारथ्य महिलांच्या हाती

Navi Mumbai Metro: नवी मुंबईत अखेर मेट्रो धावली, मेट्रोचं सारथ्य महिलांच्या हाती

मनीषा ठाकूर-जगताप, नवी मुंबई: शुक्रवारपासून नवी मुंबई मेट्रो सेवेला प्रारंभ झाला आहे. दुपारी तीन वाजता पहिली मेट्रो बेलापूर आणि पेंधर या स्थानकांतून सुटली आणि या दोन्ही ट्रेनचे सारथ्य तरुण महिला चालकांनी केले. अनेक प्रवाशांनी या महिला मेट्रो चालकांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना प्रोत्साहित केले. मेट्रोच्या चालकांच्या चमूमध्ये तीन महिला चालकांचा समावेश आहे. या महिलांना पहिल्या दिवशी पहिली मेट्रो चालवण्याचा मान मिळाला.

नवी मुंबईत अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शुक्रवारपासून मेट्रो सेवा सुरू झाली. त्यामुळे या सेवेबाबत प्रवाशांना कमालीची उत्सुकता होती. ही मेट्रो चालवणार कोण याबाबतही अनेकांच्या मनात कुतुहल होते. अनेक प्रवासी मेट्रोच्या पहिल्या डब्याजवळ जाऊन मेट्रोच्या चालकांना अभिवादन करत होते. त्यावेळी तरुण महिलांना मेट्रोचे सारथ्य करताना पाहून सर्वांना अभिमान वाटला.

पहिल्या मेट्रो चालवण्याचा मान अदिती पटियाल आणि अंकिता नाईक यांना मिळाला. अंकिता नाईक यांना मुंबईतील मोनो रेल्वे चालवण्याचा दोन वर्षांचा अनुभव आहे. ‘नवी मुंबईसारख्या निसर्गरम्य शहरात मेट्रो चालवण्याची संधी मिळाली, याचा आनंद वाटला. हा छान अनुभव आहे,’ अशी प्रतिक्रिया अंकिता नाईक यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिली.

Mumbai Pollution: धूळमुक्तीसाठी खटाटोप, मुंबईत दररोज ५०० किमी रस्ते धुतले जाणार
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed