मुंबई : दिवाळी सणाचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. भाऊबीज साजरी करण्यासाठी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून मोठा दिलासा मिळणार आहे. उद्या, बुधवारी पूर्ण क्षमतेने लोकल फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वेने घेतला आहे. आज, मंगळवारी सुट्टीचे वेळापत्रक लागू करण्यात आल्याने पाडव्यानिमित्त रेल्वेप्रवास करणाऱ्या प्रवाशांना गर्दीचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
शहर-उपनगरातील बहुतांश कार्यालयांना पाडव्यानिमित्त मंगळवारी सुट्टी आहे. काही कार्यालयांनी दिवाळीच्या दिवसात अर्थात धनत्रयोदशी ते भाऊबीज अशी सुट्टी दिली आहे. काही कार्यालयांनी घरातून काम करण्याची मुभा दिली आहे. रेल्वेगाड्यांमध्ये नोकरदारांची गर्दी कमी असणार आहे. यामुळे सोमवार आणि मंगळवारी रविवार वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेचे अधिकृत यात्री मोबाइल अॅपसह समाजमाध्यमांवरही सुट्टीच्या वेळापत्रकांची माहिती देण्यात आली होती, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

पश्चिम रेल्वेवरील सामान्य आणि एसी लोकल फेऱ्या भाऊबीजेच्या दिवशी पूर्ण क्षमतेने धावणार आहेत. आज, मंगळवारी सुट्टीच्या वेळापत्रकामुळे मोजक्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली. दिवाळी शेवटच्या टप्प्यात आलेली असतानाही सर्वसामान्यांचा खरेदीचा सपाटा सोमवारीही सुरूच होता. पाडव्याच्या आदल्या दिवशी खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना मात्र लोकलसाठी स्थानकांवर ताटकळत उभे राहावे लागले होते.
रेल्वे स्थानकांवर टीसींची फौज
रेल्वेगाड्यांसह रेल्वे स्थानकांतील विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी तिकीट तपासणीसांची फौज सुट्टीच्या दिवसांमध्येही स्थानकांत तैनात होती. स्थानकातील गर्दी व्यवस्थापनासाठी विशेष गाड्यांसह अतिरिक्त तिकीट तपासणीसांची ड्युटीही तिकीट तपासणीसांना देण्यात आली होती.