पुनवट येथे होणाऱ्या शाळेच्या प्रस्तावाबाबत शासन सकारात्मक –मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. १८ : पुनवट (जि. यवतमाळ)येथील शाळेकरिता पाच एकर जागा पुरेशी आहे. यामुळे ग्रामपंचायतीची उरलेली जमीन गावाच्या इतर विकासासाठी शिल्लक राहील. याअनुषंगाने ग्रामपंचायतीने शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाबाबत शासन सकारात्मक असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर देताना सांगितले.
आमदार संजय देरकर यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील मौजे पुनवट येथील डीएव्ही शाळेकरिता जागेच्या मागणीसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ही शाळा मायनिंग क्षेत्रात येत आहे. त्यामुळे शाळेसाठी जागा बदलून देण्यासाठीची मागणी ग्रामपंचायत व डब्ल्यू.सी.एल. ने केली होती. जिथे शासनाची जागा उपलब्ध आहे तिथे शाळा व्हावी, असा प्रस्ताव शासनाकडे आहे. शाळेसाठी १५ एकर जागेची मागणी होत असली, तरी ७०० विद्यार्थ्यांसाठी पाच एकर जागा पुरेशी आणि प्रशस्त असून उर्वरित जागा ग्रामपंचायतकडेच राहिली तर तिचा वापर इतर सार्वजनिक कामांसाठी करता येईल. याबाबत डब्ल्यू.सी.एल. आणि खासगी संस्था यांच्यात करार होईल. ही शाळा त्याच भागात झाली पाहिजे, या प्रस्तावाला शासनाची मान्यता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
०००
संध्या गरवारे, वि.स.अ.
