• Wed. Jun 17th, 2026

    Pune News : दहशतवादी हल्ल्यात वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला दिलासा, मुलगी आसावरी जगदाळे यांना अखेर प्रशासकीय अधिकारी म्हणून नोकरी

    Pune News : दहशतवादी हल्ल्यात वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाला दिलासा, मुलगी आसावरी जगदाळे यांना अखेर प्रशासकीय अधिकारी म्हणून नोकरी

    पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावणारे संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांना अखेर दिलासा मिळाला आहे. संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना शासनाकडून पुणे महापालिकेत प्रशासकीय अधिकारी म्हणून नोकरी देण्यात आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबासाठी दिलासादायक घडामोड घडली आहे. त्यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी म्हणून नोकरी देण्यात आली आहे. त्यांना वर्ग-२ पदाचे नियुक्तीपत्र मिळाले आहे. या निर्णयामुळे संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळणार असल्याचे म्हणले जात आहे. वडिलांच्या निधनानंतर आसावरी यांच्यासाठी शासकीय नोकरीची मागणी होत होती. त्या उच्चशिक्षित असून प्रशासनात काम करण्याची तयारी त्यांनी यापूर्वीच दर्शवली होती.

    मध्यंतरी अद्याप नोकरी मिळाली नाही म्हणून जगदाळे कुटुंबाने सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हस्तक्षेप करत संबंधित अधिकाऱ्यांना लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या सूचनेनंतरच या प्रस्तावाला गती मिळाल्याचे सांगितले जात आहे.

    आसावरी जगदाळे यांनी सुरुवातीला उच्च पदाची अपेक्षा व्यक्त केली होती. पण प्रशासकीय नियम आणि पात्रतेच्या चौकटीत राहूनच त्यांना वर्ग-२ पद देण्यात आले आहे. त्यामुळे “विशेष प्रकरण” असले तरी नियमांमध्ये बदल झाला नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

    दरम्यान, आता आसावरी जगदाळे लवकरच आपल्या नव्या जबाबदारीची सूत्रे हाती घेणार आहेत. त्यांच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे. ही नियुक्ती एकीकडे मदतीचा हात म्हणून पाहिली जात असली, तरी दुसरीकडे प्रशासनातील नियम आणि संवेदनशीलतेचा समतोल कसा राखला जातो, याचाही हा एक महत्त्वाचा नमुना ठरत आहे.

    मुख्यमंत्र्यांच्या फोनवरुन आसावरी यांना शुभेच्छा

    दरम्यान, आसावरी जगदाळे यांना नियुक्तीपत्र देत असताना अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आसावरी जगदाळे यांचे अभिनंदन केले. काही तांत्रिक कारणास्तव नियुक्ती रखडली होती. पण आपण एकाच दिवसात सर्व नियोजन केल्यानंतर विषय मार्गी लागला, असं मुख्यमंत्र्यांनी आसावरीच्या आईंना सांगितलं. यावेळी आसावरी जगदाळे यांच्या आईंनी मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानले.

    “नमस्कार दादा, आज तुम्ही जास्त फॉलोअप घेतल्यामुळे माझ्या मुलीचं काम झालं आहे. खूप खूप धन्यवाद. माझी आता कुठलीही तक्रार नाही. मी आता खूप आनंदी आहे. तुमच्यामुळे हे सर्व झालं”, अशा शब्दांत आसावरी जगदाळे यांच्या आईंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यानंतर आसावरी जगदाळे यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोनवर आभार मानले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा