म. टा. प्रतिनिधी, पुणे : ससून रुग्णालयातून चालविण्यात येणाऱ्या अमली पदार्थ तस्करी रॅकेटप्रकरणी अटक आरोपी ललित पाटील, रोहन चौधरी व शिवाजी शिंदे यांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने सात दिवसांची वाढ केली. ललित पाटील याच्या टोळीतील आणखी चार सदस्यांची नावे निष्पन्न झाली असून, हे सर्व आरोपी सध्या राज्याच्या विविध कारागृहांत आहेत. या आरोपींना मंगळवारी पुण्यात आणण्यात येणार आहे.
या गुन्ह्यात अटक केलेल्या व सध्या न्यायालयीन कोठडीत ठेवलेल्या आरोपींना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) पुन्हा ताब्यात घेण्यात येत आहे. राज्यातील वेगवेगळ्या शहरांत मेफेड्रॉन या अमली पदार्थांचे उत्पादन व वितरण करण्यासाठी टोळी कार्यरत असून, अरविंदकुमार लोहरे हा टोळीचा प्रमुख आहे. त्याने ललित पाटील याला येरवडा कारागृहात मेफेड्रॉन तयार करण्याचे सूत्र दिले होते, असे आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे.

आता या प्रकरणात आणखी चार आरोपींची नावे निष्पन्न झाली असून, त्यांना ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. विविध कारागृहांत असलेल्या या आरोपींना प्रॉडक्शन वॉरंटद्वारे ताब्यात घेऊन मंगळवारी ‘मकोका’ न्यायालयात हजर केले जाणार आहे. आधीचे आरोपी व नव्याने अटक करण्यात येणाऱ्या चार आरोपींची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी दिली.
ललित पाटीलसह तिघांच्या कोठडीत वाढ
अमली पदार्थ तस्करी रॅकेटप्रकरणी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने ललित पाटील, रोहन चौधरी व शिवाजी शिंदे यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत सात दिवसांची वाढ केली.