• Sat. Sep 21st, 2024

संजय राऊतांनी अजितदादांसोबत शरद पवारांनाही खडेबोल सुनावले, थेटच म्हणाले…

संजय राऊतांनी अजितदादांसोबत शरद पवारांनाही खडेबोल सुनावले, थेटच म्हणाले…

मुंबई: अजित पवार डेंग्युमुळे आजारी असताना, त्यांच्या अंगात अशक्तपणा असूनही त्यांना अंथरुणातून उठून दिल्लीला अमित शाह यांच्या भेटीला जावे लागले. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. हे म्हणजे मराठ्यांनी स्वाभिमान गहाण ठेवून दिल्लीचे चरणदास होण्यासारखे आहे, अशी खरमरीत टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. ते शनिवारी मुंबईत एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागले.

अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांना भेटू शकत नाहीत. त्यांना थकवा आलाय, शरीर कमजोर झाले आहे. त्यामुळे आपण दिवाळीत कार्यकर्त्यांना भेटणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले होते. आपल्याकडे पद्धत आहे की, आजारी व्यक्तीला इतर लोक भेटायला येतात. पण इथे शरीराने आणि मनाने आजारी असलेल्या माणसाला दिल्लीत जाऊन त्याच्या नव्या नेत्यांना भेटावे लागते. ही अत्यंत दुर्दैवीच गोष्ट आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

अजित पवार यांना सध्या विश्रांतीची गरज आहे. खरंतर अमित शाह यांनी त्यांना भेटायला आले पाहिजे. आपण शरद पवार यांच्या घरातून फोडलेला एवढा मोठा नेता, ज्याच्याकडे ४० आमदारांचे पाठबळ असल्याचे सांगितले जाते. त्या नेत्याला भेटायला अमित शाह नक्कीच येऊ शकतात. पण आजारी माणसाला अंथरुणातून उठून दिल्ली जावे लागले, असे संजय राऊत यांनी म्हटले.

पवार फॅमिलीच्या गेट-टुगेटरमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण; शरद पवार-अजितदादांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?

शरद पवारांवर राऊतांचा अप्रत्यक्ष निशाणा

यावेळी संजय राऊत यांनी पुण्यातील शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीविषयी भाष्य केले. अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील भेटीमुळे संभ्रम निर्माण होत आहे. त्याचा विचार करणे गरजेचे आहे. नातं, कुटुंब वगैरे गोष्ट ठीक आहेत. पण आमचंही कुटुंब आहे, उद्धव ठाकरेंना कुटुंब नाही का? एकनाथ शिंदे हे कालपर्यंत आमचे जिवश्च कंठश्च मित्र होतेच ना? त्यांच्यासोबत गेलेल्या अनेक लोकांसोबत आमचे घरोब्याचे संबंध होते. पण तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसलात. अशावेळी मग श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेला संदेश स्मरणात ठेवला पाहिजे. गीतेत श्रीकृष्णाने म्हटलं आहे की, यु्द्धभूमीवर काका, मामा, भाऊ अशी कोणतीही नाती नसतात. आपण योद्धे आहोत आणि युद्ध जिंकायचे आहे. त्यामुळे श्रीकृष्णाने अर्जुनला दिलेला ‘उचल ते शस्त्र आणि घाल घाव’ हा संदेश लक्षात ठेवला पाहिजे.

दोन आर्टिलरीत १०० टक्के ब्लॉकेज, ऑपरेशन टेबलवर हृदय बंद पडलं, डॉक्टरांनी शॉक देऊन जीव वाचवला: एकनाथ खडसे

आपण कुटुंबीयांनी एकत्र बसून लाडू, चकल्या खायचे. पण कार्यकर्त्यांनी लढायचं, असं चालत नाही. हे माझं मत आहे. हेच उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचही मत असेल. या भेटीगाठींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. ही गोष्ट नेतृत्त्वाच्या लक्षात येत असेल, अशी टिप्पणी संजय राऊत यांनी केली.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वीच शरद पवार मोदींसोबत येणार; रवी राणा यांचा दावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed